चांदोलीत दिवसाआड वणवा; शेकडो हेक्टर वनसंपदा खाक

गेला आठवडाभर चांदोली परिसरात दिवसाआड वणवे लागत आहेत. याचा परिणाम सह्याद्री टायगर रिझर्व्हमधील जंगलाला होत आहे. या वणव्यांमध्ये नैसर्गिक संपत्ती व वन्यजीव संपदा जळून खाक होत आहे. याकडे वन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

चांदोली परिसरात गत वर्षापेक्षा यावर्षी मार्च महिन्यात वणव्यांची संख्या दुपटीने झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या चांदोली परिसरातील वन विभागाचे नियंत्रण हे ढेबेवाडी, आंबा व शिराळा, शाहूवाडी अशा शेकडो मैल अंतरावर असणाऱया कार्यालयातून सुरू आहे. त्यामुळेच चांदोली परिसराकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष होताना दिसून येते आहे. सध्या चांदोली परिसराला पाच वन विभागाच्या परिसीमा असणाऱया कार्यालयाचा समावेश होत आहे. त्यातच हद्दीचा प्रश्न निर्माण करत वनक्षेत्रपाल दुर्लक्ष करत आहेत, तर विभागीय अधिकाऱयांना या वणव्यांबद्दल कल्पनाच नसते. यामुळे चांदोलीतील डोंगर आता काळेकुठ्ठ बनले आहेत.

वनप्राण्यांकडून होणाऱया नुकसानीवर उपाय व वन्यप्राण्यांना अन्य क्षेत्रात पळवून लावण्यासाठी वणवे लावले जात असल्याची चर्चा चांदोली परिसरात सुरू आहे. त्यातच परिसरातील शेतकऱयांचा वन अधिकारी यांच्याविरोधात असलेल्या ‘जन आक्रोश’ हादेखील याला कारणीभूत ठरत आहे. चांदोली परिसरातील लगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांपासून बचावासाठी सुरक्षा यंत्रणा राबवण्यापेक्षा वन अधिकारी हे ठेकेदार बनले आहेत. अधिकारी व कर्मचारी हे जास्त काळ वन विभागाच्या शेकडो मैल अंतरावर असणाऱया कार्यालयातच बसून उद्यानाचा गाडा हाकत असल्याने दिवसाआड वणवा लागत आहे.

या वणव्यांमुळे शेकडो हेक्टर वन्यजीव संपदा जळून खाक होत आहे. फायर टीम फक्त नावालाच असून, अधिकारी मात्र त्यांचे कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असतात. यामुळेच स्थानिकांचा वन्यजीव अधिकाऱयांबाबत रोष कायम आहे. वन अधिकाऱयांचे, वास्तव्याचे व कार्यालयात कामकाज करण्याचे ठिकाण 100 किमी अंतरावर असल्याने व वणव्यांची माहिती पोहचेपर्यंत शकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

चांदोली वन विभागाचे नियंत्रण ऑफिस कराड तालुक्यातील ढेबेवाडी व शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे आहे. हे ऑफिस पूर्वीप्रमाणे चांदोली व मनदूर येथे होण्यासाठी अभयारण्यालगत असणाऱया गावांतील नागरिकांनी अनेकवेळा मागणी करत निवेदने दिली आहेत. मात्र, वन विभागाच्या मनमानी कारभारामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वन विभागाकडील फायर टीम फक्त नावासाठीच आहे. अधिकारी फक्त कागदी घोडे नाचवताना दिसत आहेत.

– वसंत पाटील, माजी सरपंच, मनदूर