मुंबईत वर्षभरात 50 हजार टीबी रुग्ण

मुंबईत क्षयरोग निर्मूलनासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी गेल्या वर्षभरात टीबीचे 50 हजार 206 रुग्ण आढळले आहेत. 2022 मध्ये मुंबईत 55 हजार 284 रुग्ण आढळले होते. ही संख्या 2023 च्या तुलनेत कमी असल्याचे पालिकेने म्हटले आहे. मात्र ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती आणि आवश्यक औषधोपचार सुविधा उपलब्ध करणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबईकरांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सुविधा देणाऱया मुंबई महापालिकेने 2025 पर्यंत ‘टीबीमुक्त मुंबई’ हे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी पालिकेकडून वेगाने कार्यवाही केली जात आहे. संपूर्ण मुंबईतील 120 फलकांद्वारे आणि 120 बेस्ट बस थांब्यांवर क्षयरोग जनजागृती माहिती संदेश प्रदर्शित करण्यात येणार आहे. क्षयरोगविषयक ध्वनी संदेश जिंगल स्वरूपात मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या डब्यांमध्ये प्रसारित केली जाईल. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत, पालिका मुख्यालय इमारतीस आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूवर विद्युत रोषणाई करण्यात येईल. मुंबईत क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रभावी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. अतिजोखीम गटातील रुग्णांचे बीसीजी लसीकरण, रुग्णांचा आहार आणि रुग्ण शोधण्यासाठी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणतीही लक्षणे दिसली तरी तातडीने पालिकेच्या रुग्णालयाशी संपर्क करा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

क्षयरोगाची प्रमुख लक्षणे

  • दोन आठवडय़ांहून अधिक कालावधीचा खोकला
  • दोन आठवडय़ांहून अधिक कालावधीचा ताप
  • वजन कमी होणे / भूक मंदावणे
  • रात्री घाम येणे
  • मानेवर गाठ येणे

अशा आहेत उपाययोजना

क्षय रुग्णांसाठी सद्यस्थितीत मुंबईत 42 सीबीनॅट मशीन, 10 (टनॅट) मशीन्स, 3 कल्चर आणि डीएसटी लॅब याद्वारे अत्याधुनिक चाचणी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच 25 सार्वजनिक क्षेत्रातील आणि 6 खासगी पेंद्रांवर औषध प्रतिरोधी उपचारांची सुविधाही रुग्णांसाठी मोफत उपलब्ध आहे. तसेच कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या निवडक खासगी डॉक्टर आणि खाजगी रुग्णालयांमध्येसुद्धा क्षय रुग्णांचे निदान व उपचार मोफत उपलब्ध आहेत.