हिंदुस्थानात तरुण आनंदी नाहीत, तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी – रघुराम राजन

हिंदुस्थानातील तरुणांमध्ये विराट कोहलीसारखी मानसिकता तयार झाली आहे. हे तरुण मागे राहू इच्छित नाहीत. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी तरुणाई मोठय़ा प्रमाणावर विदेशात स्थायिक होत आहे. यामागे हे तरुण देशात आनंदी नसल्याचे एक कारण आहे, असे प्रतिपादन विख्यात अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केले.

अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठात ‘मेपिंग इंडिया अॅन अॅडव्हान्स्ड इकॉनॉमी 2047, व्हॉट विल इट टेक’ या विषयावरील परिसंवादात डॉ. राजन यांनी आपली स्पष्ट मते मांडली. त्यांनी आजच्या हिंदुस्थानातील तरुणांच्या मानसिकतेची तुलना विराट कोहलीशी केली. आपण इतरांपेक्षा कमी नाही. आपण सर्वात पुढे आहोत ही तरुणाईची मानसिकता बनली आहे. त्यासाठी तरुण मोठय़ा प्रमाणावर विदेशात स्थायिक होताना दिसताहेत. हिंदुस्थानी नवसंशोधक सिंगापूर आणि अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली येथे स्थायिक होत आहेत. तेथे उद्योग उभारत आहेत. विदेशात गेल्यास जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहचता येईल असे या तरुणाईला वाटते, असे राजन यांनी सांगितले.

तरुणाईच्या क्षमतेचा उपयोग हिंदुस्थानने केला पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. मी काही तरुणांशी बोललो तेव्हा जग बदलण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तर अनेकांनी हिंदुस्थानात आनंदी नसल्याचे कारणही दिले.

चीपनिर्मितीसाठी सबसिडी देण्यापेक्षा अन्य क्षेत्रात सुधारणांची गरज

सेमिपंडक्टर चीपनिर्मितीसाठी अब्जावधी डॉलर्सची सबसिडी देण्यावरून डॉ. राजन यांनी मोदी सरकारला फटकारले. चीपनिर्मितीसाठी ही सबसिडी देण्यापेक्षा अन्य क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. लेदर सेक्टरसारखी अनेक क्षेत्रे आहेत. जे अडचणीत आलेत त्या क्षेत्रांना सबसिडी दिली पाहिजे. यातून रोजगार निर्माण होईल असे राजन यांनी स्पष्टपणे सांगितले.