इचलकरंजीतील 20 घंटागाडय़ा वर्षभर बंद अवस्थेत!

 महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी खरेदी केलेल्या 68 घंटागाडय़ांपैकी वीस घंटागाडय़ा वर्षभरापासून बंद अवस्थेत असून, याबाबत नियमानुसार मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी वरिष्ठांकडे केल्यावर प्रशासनाला जाग आल्याचा प्रकार दिसून येत आहे.

इचलकरंजी शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी आदर्श फॅसिलिटी ऍण्ड मॅनेजमेंट सर्व्हिसेस, संभाजीनगर या कंपनीला टेंडर दिले आहे. कंपनीला अटी- शर्ती घालून पाच टिप्पर, दोन रेप्यूज कॉम्पॅक्टर व 68 घंटागाडय़ा या कामासाठी दिल्या. त्याची देखभाल पण मक्तेदार कंपन्यांनी करायची आहे. मात्र, सध्या यापैकी 20 गाडय़ा वर्षभर बंद अवस्थेत आहेत. काही घंटागाडय़ांना हौदाच नाही, तर काही गाडय़ांची चाके पंक्चर आहेत. या चाकासभोवती मोठय़ा प्रमाणात कचरा साठला आहे.

मक्तेदाराकडे तक्रार करूनही दखलच घेतली जात नाही आणि महापालिकेला कळविले तर केवळ कागदी घोडे नाचवले जातात. यामुळे हत्तीकर यांनी राज्य प्रशासनाकडे तक्रार करून चाललेल्या बेकायदा कामाबद्दल कायदेशीर दंड करावा. कामात कसूर केल्याप्रकरणी अधिकाऱयावर ही कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. ही बाब लक्षात येताच, मनपा प्रशासनाने मक्तेदाराकडून तीन महिन्यांचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. व्हिडीओ शूटिंगसह पुरावे असल्याने मक्तेदार अहवाल खरा देणार की खोटा, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर काहींचे धाबे दणाणले आहे.