2019 मधील भाजपचा मोठा विजय हेराफेरीमुळे, अशोका विद्यापीठातील प्राध्यापकांच्या शोधनिबंधामुळे वाद

2019 च्या निवडणुकांत हेराफेरी केल्यामुळेच भाजपने मोठा विजय मिळवला असावा, असे सूचित करणाऱया प्रा. सब्यासाची दास या अशोका विद्यापीठातील प्राध्यापकांच्या शोधनिबंधामुळे वादाला तोंड फुटले असून, विद्यापीठातील बहुतेक विभाग प्रा. दास यांच्या बाजूने उभे ठाकले आहेत. प्रा. दास यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांना परत घ्यावे यासाठी त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी विद्यापीठाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

या शोधनिबंधावरून वादंग सुरू झाल्यावर प्रा. दास यांनी देऊ केलेला राजीनामा स्वीकारल्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळालाही तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. एका प्राध्यापकाने प्रा. दास यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला असून 23 ऑगस्टपर्यंत प्रा. दास यांना कामावर परत घेईपर्यंत आम्ही शिकवणार नाही, असा इशारा दास यांच्या अर्थशास्त्र विभागातील इतर प्राध्यापकांनी दिला आहे. इतर काही विभागांनीही प्रा. दास यांना पाठिंबा दिला आहे.

प्रा. दास यांच्या दाव्यांमुळे एकच गदारोळ उठल्यावर त्यांनी राजीनामा दिला. मात्र, आता विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाने या शोधनिबंधाची गुणवत्ता निश्चित करण्यात हस्तक्षेप केल्यास अनेक प्राध्यापक विद्यापीठ सोडून जातील, असा इशारा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी एका खुल्या पत्राद्वारे दिला आहे. इंग्लिश आणि सर्जनशील लिखाण विभागांनीही एका संयुक्त निवेदनाद्वारे प्रा. दास यांना त्वरित सेवेत घ्यावे अशी मागणी करत, मूलभूत शैक्षणिक स्वातंत्र्याच्या मुद्दय़ांशी निगडित प्रश्नांची या मान्सून सत्रात उकल न झाल्यास आम्हाला शिकवणे शक्य होणार नाही, असा इशारा दिला आहे.

दास यांच्या शोधनिबंधावरून वाद सुरू झाल्यावर विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी किंवा कर्मचारी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर समाजमाध्यम वा जाहीरपणे कसे व्यक्त होतात याच्याशी विद्यापीठाचा संबंध नाही, ती विद्यापीठाची भूमिका नाही, असे विद्यापीठाने म्हटले होते. विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळावर चॅन्सलर रुद्रांक्षू मुखर्जी, प्र-कुलगुरू सोमक रायचौधरी, मधू चांडक, पुनीत दालमिया, आशीष धवन, प्रमाथ राज सिन्हा, सिद्धार्थ योग, दीप कालरा आणि झिया लाल्का यांचा समावेश आहे.

शोधनिबंध काय म्हणतो…
जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीत लोकशाहीची पीछेहाट या शीर्षकाच्या शोधनिबंधात प्रा. दास यांनी केलेल्या दाव्यानुसार, 2019 च्या निवडणुकांत अत्यंत अटीतटीची लढत झालेल्या जागांपैकी भाजपने जिंकलेल्या जागांचा आकडा अवाजवी मोठा असल्याचे म्हटले होते. विशेषतः भाजप सत्तेवर असलेल्या राज्यांमध्ये हे प्रकर्षाने जाणवते, असे निरीक्षण मांडणारा त्यांचा हा शोधनिबंध ‘सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क’वर 25 जुलै रोजी प्रसिद्ध झाला होता. प्रा. दास यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक निरीक्षकांच्या दुबळय़ा देखरेखीचा अंशतः फायदा घेत मुस्लिमांविरुद्ध निवडणूक भेदभाव करत भाजपने ही कथित निवडणूक हेराफेरी घडवून आणली असावी. प्रा. दास यांच्या शोधनिबंधानुसार, काँग्रेस वा भाजपने अशा प्रकारचा अवाजवी मोठा विजयी निकाल पूर्वीच्या कुठल्याच निवडणुकांत मिळवला नव्हता. यावेळी मात्र भाजपशासित राज्यांमध्येच प्रामुख्याने असा विजय दिसावा याचे कारण एकतर भाजपने मतदानात हेराफेरी केली असावी किंवा चुरशीच्या लढतीतील कौल अचूक ओळखून तिथे जोरदार प्रचार यंत्रणा राबवली हेच असावे.