मिलिंद देवरांसह 23 जण काँग्रेसमधून निलंबित

माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मिलिंद देवरा यांच्यासह मिंधे गटात प्रवेश करणाऱ्या 23 जणांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे.

मिलिंद देवरा यांच्यासोबत दक्षिण मुंबई जिह्याचे अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेविका सुशीबेन शहा, सुनील नरसाळे, रामबच्चन मुरारी, हंसा मारू, अनिता यादव हे माजी नगरसेवक, दक्षिण मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश राऊत आणि ऍड. त्र्यंबक तिवारी यांच्यासह 23 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या 23 जणांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी रविवारी रात्रीच या सर्वांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.

दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी आज दिवसभर दक्षिण मुंबईतील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या सर्वांनी आपण काँग्रेससोबतच असल्याची ग्वाही दिली. या वेळी आमदार अमीन पटेल, ज्येष्ठ नेते भवरसिंह राजपुरोहित, पालिकेतील माजी विरोधी पक्षेनेते ज्ञानराज निकम, किशन जाधव, अश्फाक सिद्दिकी, पूरन दोशी उपस्थित होते.

या वेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पक्ष आणि विचारधारा यांच्याशी प्रामाणिक राहून काम करणारे लोकच यशस्वी होतात. मिलिंद देवरांनी पक्षाशी आणि विचारधारेशीही फारकत घेतली. पण एक व्यक्ती सोडून गेल्याने पक्ष खिळखिळा होणार नाही आणि पक्षाची विचारधाराही  कमकुवत होणार नाही. उलट त्यामुळे माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांना काम करायला बळ मिळाले आहे.