काय सांगता काय! मोबाईल टॉवरच चोरीला गेला, उत्तर प्रदेशातील अजब घटना

 

राज्यात दरवर्षी अनेक लहान मोठ्या चोऱ्या होत असतात. मात्र गेल्या काही वर्षात महाकाय गोष्टी लोकांच्या डोळ्यादेखत चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी बिहारमध्ये 60 फूट लांबीचा लोखंडी पूल चोरीला गेला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाही तोवरच आणखी एक मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील उज्जैनी गावात 10 टन वजनाचा 50 मीटर उंच मोबाईल टॉवर चोरीला गेला आहे. या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने या संदर्भातील तक्रार पोलिसांत नोंदवली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, केवळ टॉवरच नाही तर इलेक्ट्रिकल फिटिंग आणि इतर उपकरणे चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. चोरी करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत हीसुमारे 8.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.  पोलिसांनी सदर प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळाची पाहणी करून जमीन मालक आणि स्थानिकांचे जबाब नोंदविले आहेत.

तक्रारदार राजेश कुमार यादव यांच्या म्हणण्यानुसार जानेवारी महिन्यात उज्जैनी गावातील एका शेतात टॉवर बसवण्यात आला होता. 31 मार्च 2023 रोजी टॉवरच्या पाहणीसाठी घटनास्थळी भेट दिली तेव्हा टॉवरसह , इतर सामान देखील चोरीला गेल्याचे आढळून आले होती. सदर प्रकाराबाबत तक्रारदाराने बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु असून पोलिसांना प्रशासनाने धारेवर धरले आहे.