रुचकर ‘दम बिर्याणी’ प्रेक्षकांना भावली

दम बिर्याणी’ या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगचे मंगळवारी मुंबईत आयोजन करण्यात आले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर विशेष पाहुण्यांसह समीक्षकांनीदेखील ‘दम बिर्याणी’चे तोंडभरून कौतुक केले. ‘दम बिर्याणी’चे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अनिकेत बदामे यांनी दहशतवादाचा मुद्दा आपल्या चित्रपटातून नव्या दृष्टिकोनातून मांडला आहे. एवढा गंभीर विषय त्यांनी ज्या पद्धतीने लोकांसमोर मांडला आहे, त्यामुळे लोकांना विचार करण्याची नवी दृष्टी मिळेल, यात शंका नाही. ‘दम बिर्याणी’ हा एक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे आणि या चित्रपटात अनेक अनपेक्षित ट्विस्ट आहेत जे शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवतात. गौरव घाटणेकर आणि साईशा साळवी यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.