भाजप उमेदवाराची गळाभेट महागात; महिला पोलीस उपनिरीक्षक निलंबित

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना हैदराबादमधील भाजप उमेदवार माधवी लता यांच्याशी हस्तांदोलन करणे आणि त्यांची गळाभेट घेणे एका महिला पोलीस अधिकाऱयाला चांगलेच महागात पडले. या महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. उमा देवी असे या पोलीस अधिकाऱयाचे नाव असून डय़ुटीदरम्यान त्यांनी ही गळाभेट घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पोलीस आयुक्त श्रीनिवास रेड्डी यांनी उमा देवी यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले. सैदाबादच्या एएसआय उमा देवी लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या भाजप उमेदवार माधवी लता यांच्याशी हस्तांदोलन करतानाचा आणि त्यांची गळाभेट घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. वरिष्ठ अधिकाऱयांनी अधिक तपास केला असता उमा देवी यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे हैदराबादचे पोलीस आयुक्त श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले.