50 लोकं दावोस दौऱ्यावर जाऊन करणार काय ? दौऱ्याच्या खुलाशावर आदित्य ठाकरेंचा सवाल

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर सोमवारी सडकून टीका केली होती. अवघ्या दहा लोकांना जाण्याची परवानगी असतानाही घटनाबाह्य मुख्यमंत्री 50 लोकांना घेऊन दावोसला निघाले आहेत. आधी 50 खोके होते, आता 50 लोक आणि सोबत दलालही घेऊन निघालेत. वऱहाड निघालंय लंडनला तसे हे वऱ्हाड निघालंय दावोसला, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने खुलासा केला होता. या खुलाशातून मूळ प्रश्नांची अद्याप उत्तरे मिळाली नसून आदित्य ठाकरे यांनी त्यावर पुन्हा एकदा बोट ठेवले आहे. आदित्य ठाकरे यांनी X वर एक पोस्ट केली असून याद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,

“माझ्या सकाळच्या पत्रकार परिषदेनंतर,मुख्यमंत्री कार्यालयाने शेवटी एक प्रेस नोट जारी केली आहे, ज्यात बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या दावोस ‘मौजमजेच्या’ दौऱ्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे.

परंतु प्रश्न अजूनही शिल्लक आहेत:

1) जवळपास 50 लोक ह्या दौऱ्यावर जाऊन काय करतील? त्यांनी नावं जाहीर करण्याआधी आम्हीच ती नावं जाहीर करू का?

2) हे 50 लोक दावोसला जात नसतील तर उद्या परवा ते मुंबईत दिसणार आहेत का? की ते गुपचूप दावोसला जातील? तरीही कोणीतरी त्यांना तिथे नक्की पाहिलच.

3) मुख्यमंत्र्यांना 1 पीएस, 1 पीए, 7 ओएसडी, 5 पद नसलेल्या व्यक्ती, दलाल आणि फिक्सर, 3 पीआरओ आणि प्रचारकांची गरज का आहे? तेही अश्या ठिकाणी जिथे प्रवेशावर अत्यंत कडक असे निर्बंध आहेत!

4) उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित नसताना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी सोबत असण्याची आवश्यकता का पडावी?

5) वर्तमान खासदार आणि माजी खासदार देखील शिष्टमंडळाचा एक भाग आहेत. शिष्टमंडळात त्यांची नेमकी भूमिका काय?

6) सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी संबंधित विभागातील फक्त 1 अधिकारी आवश्यक असतो, अख्खा लवाजमा नाही.

ह्या शिष्टमंडळात अजूनही MMRDA, MIDC, MSRDC, MAHAPREIT आणि अशा विभागांकडून किमान 5 जण जात असल्याचे दिसते.

MMRDA स्वतंत्रपणे जात असल्याचा CMO चा दावा असेल तर,

अ) एमएमआरडीए (@MMRDAOfficial) हे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाद्वारे चालवले जाते का?

ब) हे अधिकारी स्वतःच्या खिशातून पैसे देत आहेत की MMRDA देते?

क) उद्योग मंत्र्यांनी सांगितलं आहे, की काही जण स्वखर्चाने दावोसला जाणार आहेत! वाह! हे नक्की कोण कोण आहेत? त्यांची नावं आणि पद किंवा दावोसमधल्या त्यांच्या जबाबदाऱ्या जाहीर कराव्यात!

ह्या फसवणुकीची चौकशी करण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करणार आहोत.

आदित्य ठाकरे यांनी सोमवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याचा लेखाजोखा मांडला. ‘आज मकर संक्रांत आहे. गोड बोलण्याचा दिवस आहे, पण सत्यसुद्धा बोलले पाहिजे’, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर निशाणा साधला होता. दौऱ्यात ज्यांना परवानगी देण्यात आली आहे ते त्यांच्या सोबत बायकोला घेऊन जाऊ शकतात. इथे तर मुख्यमंत्री मित्रांना आणि त्यांच्या मुलांनाही घेऊन जाताहेत. यामध्ये महाराष्ट्र सरकारचा आणि सर्वसामान्य जनतेचा पैसा जातोय, अशी टीका करतानाच भाजपने या दावोस दौऱ्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.

किती लोकांना परवानगी मिळाली ते सांगा

‘घटनाबाह्य मुख्यमंत्री दावोसच्या दौऱ्यावर निघाले आहेत. यापूर्वीच्या दावोस दौऱ्यावर त्यांनी 24 तासांत 40 कोटी रुपये खर्च केले होते असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यातील सदस्य संख्येवरून प्रश्न उपस्थित केले. परदेश दौऱ्यावर जाताना परराष्ट्र मंत्रालय आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागते. परराष्ट्र मंत्रालयाने 50 लोक न्यायला परवानगी दिली आहे का, या दौऱ्याला तरी मंजुरी मिळाली आहे का, परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती आहे का? असा सवाल त्यांनी केला. किती लोकांना परवानगी मिळाली आहे, दावोसमध्ये कुणाकुणाला भेटणार हे सरकारने जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी केली.

गुंतवणूक महाराष्ट्रात की गुजरातला?

राज्य सरकार 50 लोकांचा ताफा सोबतीला घेऊन दावोसला जात आहे. त्यांच्यावर तब्बल 34 कोटी रूपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एवढा मोठा सरकारी ताफा आणि खर्च केल्यानंतर तरी परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येणार की केंद्रात बसलेल्या महाशक्तीच्या ताकदीने गुजरातमध्ये जाणार असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी केला आहे. तसेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून राज्याच्या हिताची किती कामे होतील अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

इतके लोक बॅगा उचलायला की गाडय़ा ढकलायला?

पाच-सहा जणांचे काम आहे, तिथे 50 जणांचा लवाजमा कशासाठी? बॅगा उचलायला की गाडय़ांना धक्का मारायला? अशी खिल्ली आदित्य ठाकरे यांनी उडवली. रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, मुख्यमंत्री व एका उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी यांच्यासह तीन-चार दलालसुद्धा दौऱ्यात असल्याचे समजले. एकाच उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी का, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी का नाहीत, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

50 जणांच्या लटांबरासोबत मिंधे निघाले

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 50 जणांच्या लटांबरासोबत रवाना झालेत. दावोस येथे 15 ते 19 जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसह, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी व अन्य मिळून 50 जणांचा यामध्ये समावेश आहे. या परिषदेत तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येतील, असा दावा सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. या दौऱ्याच्या खर्चासाठी 34 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.