जे लढताहेत ते आमच्यासोबत आहेत, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

जे लढत आहेत, ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखे नाही, जे सच्चे देशभक्त आहेत ते आमच्यासोबत उभे आहेत. सगळ्यांवरच प्रेशर आहे. पण ज्यांच्याकडे लपवण्यासारखे बरेच काही आहे ते मिंधे गटात आणि भाजपात जात आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तपास यंत्रणांकरवी होत असलेल्या कारवाईवरून निशाणा साधला.

रवींद्र वायकर, राजन साळवी, सूरज चव्हाण हे सगळेच लढत आहेत. आम्ही काही चूक केलेली नाही, हे ठणकावून सांगत आहेत. चूक केली असती तर तुमच्यासोबत आलो असतो. चूक केली नाही म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहोत, असा निडर बाणा त्यांनी दाखवला आहे, असे काwतुक आदित्य ठाकरे यांनी केले.

वॉशिंग मशीनमध्ये गेले ते घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले

महापत्रकार परिषद झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी ईडीने सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली. पण यात जी पंपनी आहे त्याचे मालक मात्र मिंधे गटात आहेत. त्यानंतर राजन साळवी यांच्यावर एसीबीने धाड टाकली. त्यांनीही कणखर भूमिका घेतली. आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार, असे त्यांनी सांगितले. रवींद्र वायकर यांच्यावरही असाच दबाव आहे. भाजपात या, शिंदे गटात या असा दबाव टाकला जात आहे. पण तो झुगारून हे सगळेच निडरपणे लढत आहेत. त्यांनी हीच भूमिका घेतली आहे की आम्ही काही चुकीचे केलेले नाही आणि काही लपवण्यासारखे असते तर आम्ही शरण आलो असतो जसे बाकीचे शरण गेलेत. वॉशिंग मशीनमध्ये गेलेत. त्यातले कुणी घटनाबाह्य मुखमंत्री झालेत, कुणी उपमुख्यमंत्री झालेत तर  कुणी मंत्री झालेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.