…तर आपलं राज्य गुजरातमध्ये विलीन करतील – आदित्य ठाकरे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार यांनी बुधवारी सिन्नर येथे शिवसैनिकांचा मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी भाषण करताना त्यांनी भाजप व मिंधे सरकारला फटकारले. ‘राज्यातील अनेक प्रकल्प या सरकारने गुजरातला पळवले आहेत. कारण हे पळून गेले होते तेव्हा यांना गुजरातनेच आश्रय दिला होता. जर असंच सर्व गुजरातला जात राहिलं तर एक दिवस हे आपले राज्यच गुजरातमध्ये विलीन करतील’, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

”आपण जसं लढत आहोत. तसंच मणिपूर जळतंय. तिथे कुणी गेलेलं नाही. अख्खा दक्षिण हिंदुस्थान दिल्लीत आंदोलन करतोय. हक्काच्या पैशासाठी लढा देतायत तिथले मुख्यमंत्री. आपण जो कर म्हणून देतो तो हक्काचा पैसा आपल्याकडे यायला पाहिजे तो वर्षानुवर्ष केंद्र सरकारने दिलेला नाही. आपल्या नागरिकांचा पैसा आपल्याकडे आलेला नाही. महाराष्ट्राचे तब्बल 20 ते 25 हजार कोटी अडकलेयत. तो महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा आहे. केरळ तामिळनाडू सगळे मुख्यमंत्री लढत आहेत. झगडत आहेत. आमचा हक्काचा पैसा परत द्या म्हणून दिल्लीत आंदोलनं सुरू आहेत आणि महाराष्ट्राचे घटनाबाह्य मुख्यमंत्री दिल्लीसमोर लोटांगण घालत आहेत. आपल्यासाठी लढणार कोण आपल्यासाठी. जर तो पैसा आला असता तर सहज आपण शेतकरी महिला व तरुणांसाठी खूप काही करू शकलो असतो. दुर्दैव आपलं हेच आहे की आपल्या राज्याचे सरकार दिल्लीसमोर चिडीचूप आहे. यांच्यावर दिल्लीची मेहेबाणी आहे. शिवसेना राष्ट्रवादी फोडून जे खोके सरकार बसवलेलं आहे. हे खोके सरकार दिल्लीसमोर काहीच बोलू शकणार नाही. एवढे जर तुमच्याकडे 215 विधानभवनात गोळे केले आहेत. एवढं बहुमत महाशक्ती तुमच्याकडे असेल, तर माझा शेतकरी आत्महत्या करतोय त्यांना महाराष्ट्राला मदतीची गरज आहे. मोठं पॅकेज महाराष्ट्राला द्या. घटनाबाह्य मुख्यमंत्री दिल्लीसमोर काही बोलत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्री शेतकरी म्हणतात. स्वयंभू शेतकरी आहेत ते. त्यांच्या गावात जायला रस्ता नाहीए. पण दोन दोन हेलिकॉप्टर त्यांच्या शेतात उतरतात. पण आज मुद्दा हाच आहे की शेती करतात तरी कसली. पण यांची शेती अमावस्या आणि पौर्णिमेला केली जाते. बरोबर शहरातू गायब होतात. कधी गावात जातात. कधी पडघ्याला जातात. हे राज्य कुठे नेतायत. एका बाजूला शेतकरी त्रस्त हैराण आहेत. तर दुसरीकडे हे सरकार दिल्लीश्वरांसमोर गप्प आहेत. पण मी आज तुम्हाला वचन देतो की येत्या निवडणूकात आपण जिंकणार व शेतकऱ्यांचं सरकार बसवणारच”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या दीड वर्षात एकही नवा उद्योग महाराष्ट्रात आलेला नाही. प्रत्येक उद्योग ज्यांनी यांच्यावर मेहेरबानी केलेली आहे त्यांच्या राज्यात पाठवला जातायत. आम्ही वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट आणणार होतो. त्या कंपनीमुळे एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळाल्या असतात. मात्र त्यानंतर या गद्दारांनी आमचं सरकार पाडलं. सरकार बदललं त्यानंतर रातोरात हा प्रकल्प गुजरातला गेला. एअरबस टाटाचा प्रकल्प नागपूरमध्ये आणणार होतो, तो देखील गुजरातला गेला. सगळे प्रकल्प गुजरातला पळवले कारण गद्दारांना पहिल्यांदा आश्रय गुजरातने दिला होता. यांना मुंबई व महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत करायचे आहे. एकदा राज्य कमकुवत झाले की त्यांना आपलं राज्य गुजरातमध्ये विलीन करता येईल. महाराष्ट्र संपला की गुजरातला महाराष्ट्रात आणता येईल, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

” राज्यात सध्या दिवसाढवळ्या गोळीबार सुरू आहेत. आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतायत, गणपतीच्या मिरवणूकीत गोळीबार होतोय. आमच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केली जातेय. आमदाराचा मुलगा किडनॅपिंग करतो. हे असे प्रकार महाराष्ट्रात घडतायत. यांना इथलं वातावरण असं करायचं आहे की कुठल्याही उद्योगपतीने इथे गुंतवणूक कऱण्याचा विचार केला नाही पाहिजे. आज महिला सुरक्षित नाहीत. आमदाराने महिला खासदाराला शिव्या दिलेल्या आहेत. अशा लोकांना मंत्रीमंडळात ठेवलंय कारण यांचे मुख्यमंत्रीच एका चिंधीचोर गँगलीडर असल्यासारखे आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

”महाराष्ट्र अजुनही उद्धव ठाकरे यांना कुटुंबप्रमुख मानलं जातं. म्हणूनच आमच्या छोट्या सभांना देखील मोठी गर्दी होत आहे. कारण लोकांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या सुसंस्कृत व्यक्तीवर विश्वास आहे. त्यांच्याकडून कधीच आपण शिवीगाळ झालेला ऐकलेला नाही. त्यांच्याकडून वेडवाकडं बोललंलं, वागलेलं पाहिलेला नाही. जे मंत्री खोटं बोलतात, महिलांचा अपमान करतात. उद्धव ठाकरे त्यांना गेटआऊट करून लाथ मारतात. अशा उद्धव ठाकरेंचं सरकार या चिंधी चोरांनी पाडलं. जी व्यक्ती शाखाप्रमुख पदाच्या लायकीची नाही त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवलंय, आदित्य ठाकरे यांचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

”भाजप सांगत आलीय की काँग्रेसमुक्त भारत करू, वंशवाद मुक्त, भ्रष्टाचारमुक्त भारत करू असे सांगत होते. आता राज्यसभा निवडणूका आल्या आहेत ज्या तिघांना यांच्याकडून तिकीट मिळाल्या आहेत ते सगळे काँग्रेसवाले आहेत. सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, सगळे वंशवादवाले आहेत मग कुणाला मुर्ख बनवताय? असा खणखणीत सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.