राजन साळवी यांना पुन्हा समन्स, भावालाही सोमवारी चौकशीला बोलावले

एसीबीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, आमदार राजन साळवी यांना आज पुन्हा समन्स पाठवत सोमवार 22 जानेवारी रोजी चौकशीस हजर राहण्यास सांगितले आहे. आमदार राजन साळवी यांचे मोठे बंधू दीपक साळवी यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी येथील कार्यालयात चौकशीस बोलावले आहे.

राज्यात सध्या भाजप आणि मिंधे सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू आहे. आमदार राजन साळवी यांच्यामागे बेहीशोबी संपत्तीच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीचा ससेमीरा लावला आहे. एसीबीने आमदार साळवी यांच्यावर मिळकतीपेक्षा 3 कोटी 53 लाख 89 हजार 752 रुपयांची अधिकची संपत्ती सापडल्याच्या आरोपाखाली चौकशी सुरू केली आहे. एसीबीच्या चार पथकांनी गुरुवारी रत्नागिरी येथील साळवी यांचे घर आणि हॉटेलवर धाड टाकून सुमारे दहा तास चौकशी केली. मागील काही महिन्यांपासून सुरू असणाऱया चौकशीच्या या प्रकरणात आता त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ साळवी यांचे मोठे भाऊ दिपक साळवी यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी मोर्चा वळवला आहे. सोमवार 22 जानेवारीला चौकशीच्यावेळी आमदार राजन साळवी व दिपक साळवी या दोघांनाही हजर राहावे, अशी नोटीस एसीबीच्या अधिकाऱयांनी दिली आहे.

कुटुंबीयांना त्रास देण्याचे षडयंत्र

राज्यातील सत्ताधाऱयांकडून केवळ चौकशीच्या नावाखाली दबावाचे राजकारण सुरू आहे. मी कोणतेही चुकीचे काम केले नसताना आणि यापूर्वी झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत सर्व माहिती दिली आहे. त्यानंतरही माझ्या कुटुंबीयांना त्रास देण्याचे षडयंत्र सुरू आहे, असे राजन साळवी म्हणाले.

शिंदे गटात जाण्यासाठी कारवाई

माझ्यावर ही कारवाई मी ंिशदेगटात जाण्यासाठी आकसापोटी केलेली आहे. मी अटकपुर्व जामीन देणार नाही. मी लढायला तयार आहे. काल चौकशी पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱयांनी आम्ही हा अहवाल वरिष्ठांकडे देऊन त्यांचे पुढील मार्गदर्शन घेऊ असे सांगितले होते. आपला मोबाईल पह्न त्यांनी जप्त केला असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार

माझी निष्ठा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या चरणांपाशी आहे. मी आणि माझे कुटूंबीय मरेपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू असे आमदार राजन साळवी यांनी ठणकावून सांगितले.

आतापर्यंत 70 जणांना एसीबीच्या नोटीस

या प्रकरणात यापूर्वी आमदार राजन साळवी यांनी सहा वेळा अलिबाग येथील एसीबीच्या कार्यालयामध्ये हजर लावली होती. तसेच त्यांचा भाऊ, पुतण्या, वहिनी, स्वीय सहाय्यक यांनाही चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर साळवी यांच्या विधानसभा मतदार संघात ज्या ठेकेदारांनी लोकोपयोगी कामे केली त्या ठेकेदारांनाही नोटीस देऊन चौकशीला बोलवले होते. आत्तापर्यंत 70 अधिकजणांना नोटीसा देऊन चौकशीस बोलविण्यात आले होते, अशी माहिती आमदार साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय साळवी उपस्थित होते.