कोणाच्या पैशाने ही पैशांची उधळपट्टी सुरू आहे, अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल

छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत सामिल होणाऱ्यांसाठी शहरातील सर्व फाईव्ह स्टार हॉटेल बुक करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. तसेच या मंत्र्यांसाठी संभाजीनगर शहरात 150 गाड्यांची सोय करण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारची ही जी काही उधळपट्टी सुरू आहे ती कोणाच्या पैशातून सुरू आहे, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.

”मंत्र्यांसाठी वेगळ्या 150 गाड्यांची गरज काय होती. शासकीय गेस्ट हाऊस असताना फाईव्ह स्टार हॉटेल बुक का केले. यांच्यासाठी बुक केलेल्या हॉटेलच्या रुमचे भाडे 33 हजार रुपये आहे. कलेक्टरने 15 15 दिवस आधी इकडचे फाईव्ह स्टार हॉटेल बुक केलेले आहेत. हे सर्व कोणाच्या पैशातून सुरू आहे?” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

मंत्र्यांसाठी 150 गाड्यांचा ताफा तयार ठेवण्यात आल्याच्या वृत्तावरुनही त्यांनी सरकारला फटकारले आहे. ”त्या त्या डिपार्टमेंटच्या गाड्या त्या त्या मंत्र्यांसाठी वापरल्या जायल्या हव्या. प्रत्येक डिपार्टमेंटला गाड्या आहेत. 2 दिवस अधिकाऱ्यांनी स्वत:ची गाडी मंत्र्याला दिली तर काय बिघडली”, असे दानवे म्हणाले.