विशेष: पुस्तकं बियांसारखी…

>> अरविंद जगताप

मोबाइल नव्हता त्या काळातली गोष्ट. सेल्फी घेताना आपण जसा मोबाइल समोर धरतो तसं पुस्तक धरायचे लोक तोंडासमोर. फक्त पुस्तक समोर धरायची गरज, डोळे अक्षरांवर फोकस सेट करायचे आपोआप. पानं स्वतच फिल्टर व्हायची. चार-दोन पानं उलटली की, फ्रेम सेट व्हायची. आठ-दहा पानं पुढे गेलो की, आपोआप फ्लॅश चमकू लागायचा मेंदूत. पंधरा-वीस पानं वाचून झाली की, चेहऱयावरचे हावभाव ठळक व्हायचे. पुस्तक पूर्ण झालं तरी मेमरी फुल व्हायची भीती नसायची. मोबाइल नव्हता त्या काळात पुस्तक असायचं डोळ्यांसमोर. आपले केस, आपले ओठ, आपले डोळे यापलीकडे खूप काही बघायचे लोक. पुस्तकातून जग कळायचं. पुस्तकात खुणा करायची सवय होती लोकांना. आता मोबाइल विकताना किंवा दुसऱयाला देताना आधीचा सगळा डेटा डिलीट केला जातो. तसं नसायचं. खूपदा आधी पुस्तक वाचणारा खुणा करून ठेवायचा. महत्त्वाचं काय ते वाचायला सोपं जायचं. मोबाइल नव्हता त्या काळात पुस्तक असायचं उशाशी. पुस्तक जेवढं वाचलंय ते पान लक्षात ठेवायला मोरपीस असायचं, बुकमार्क असायचा.

मोबाइलमुळे नको ती माहिती आदळत राहते. पुस्तकात आपल्याला हव्या त्या माणसांबद्दल जाणून घ्यायची सोय असते. मोबाइलवर नको नको ते लिखाण डोळ्यांसमोर येत राहतं. पुस्तक मात्र आपण निवडलेलं असतं. जीए कुलकर्णी असतील, नेमाडे असतील, नारायण सुर्वे असतील, भाऊ पाध्ये असतील. एवढी मोठमोठी माणसं त्यांच्या कल्पनेचं अद्भुत विश्व घेऊन आपल्या डोळ्यांसमोर हजर. पुस्तक उघडा, अर्पणपत्रिका बघा, प्रस्तावना वाचा. अपामणिका चाळा. पुस्तकात कितीतरी कुतूहल दडलेलं असतं. मोबाइलचा उजेड डोळ्यांना नकोसा होतो. पुस्तक डोक्यात उजेड पाडतं. दरवेळी पुस्तक चांगलंच असेल असं नाही, पण काय वाचू नये हे तर नक्कीच कळतं. पुस्तक स्वत स्मार्ट असल्याचा दावा करत नाही मोबाइलसारखा. पुस्तक आपल्याला स्मार्ट करण्याचा प्रयत्न मात्र नक्की करत राहतं. मोबाइल घेताना आपण एक सूचना देणारं यंत्र घेतो. जे आपल्या वेळेवर ताबा मिळवणारं असतं. पुस्तक आपल्या वेळेनुसार वाचायचं असतं. हळूहळू आपण त्यात गुंतून जातो. पुस्तक वेगळ्या जगात नेतं. शब्द लेखकाचे असले तरी त्या जगाचं चित्र आपण रंगवलेलं असतं. पुस्तक आपली कल्पनाशक्ती वाढवतं.पुस्तक एकच असलं तरी प्रत्येक वाचकाने त्याच्या मनात रंगवलेलं चित्र वेगळं आहे. इथे प्रत्येकाचा ययाती वेगळा, पांडुरंग सांगवीकर वेगळा आणि प्रत्येकाची बनगरवाडी वेगळी आहे.

पुस्तकं बियांसारखी असतात वाचकांसाठी. कुठे त्या उगवत नाहीत, कुठे त्या वेगात वाढतात आणि डेरेदार सावली देतात. पुस्तकं लेखकांपासून सुरू होतात. वाचकापाशी पूर्ण होतात. कधी सावली बनून, कधी कोंब बनून, कधी वणवा बनून. मोबाइलचं एक भयंकर आहे. तो आपल्या खासगी जीवनात सारखा डोकावत असतो. पुस्तक आपल्या खासगी जीवनात डोकावत नाही. पुस्तक जो वाचतो त्याचं असतं. ते वाचताना तुमचे डोळे पाणावले होते की तुमच्या गालावर खळी पडली होती हे पुस्तक कुणाला सांगत नाही. पुस्तकाची आणि तुमची गोष्ट पोट असते. तुमचे आणि पुस्तकाचे हे बंध असतात कारण तुम्ही पुस्तक वाचता आणि ही फारच भारी गोष्ट आहे.