भाजपला मदत होईल असे काम मी करणार नाही! प्रकाश आंबेडकरांना आनंदराज आंबेडकरांचे खरमरीत पत्र

अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारीला पाठिंबा देण्यावरून अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये वाद पेटला आहे. उशिरा पाठिंबा देण्यावरून आनंदराज यांनी प्रकाश आंबेडकर आणि वंचितला खरमरीत पत्र लिहिले आहे. तुमचे पाठिंब्याचे पत्र हा खोटारडेपणा आणि संविधानप्रेमी जनतेची दिशाभूल आहे, असा आरोप करतानाच संविधान बदलण्याचा डाव असलेल्या भाजपला मदत होईल असे काम मी करणार नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी ठणकावले आहे. काहीही झाले तरी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय बदलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती मतदारसंघातून 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे पत्र वंचितकडून आज देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय जनता पक्षाने संविधान बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला सांविधानिक पद्धतीने प्रत्युत्तर देण्यासाठी आपण अमरावतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काही संविधानप्रेमी सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. वंचितकडूनही पाठिंबा मिळावा म्हणून तीन दिवसांपूर्वी पत्र देऊनही त्यावर टाळाटाळ केली गेली. दुसरीकडे वंचितकडून इतर उमेदवारांना पाठिंबा दिला जात होता, असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी वंचितला पाठवलेल्या पत्रात केला आहे.

वंचितच्या दुटप्पीपणावर बोट

माझ्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी समर्थन करेल व वंचितने जाहीर केलेला उमेदवार नामांकन दाखल करणार नाही असे आपल्या पक्षाने व अधिकृत स्थानिक पदाधिकाऱयांनी आम्हाला कळवले आहे. हा तुमचा प्रयत्न अतिशय धादांत खोटा, चुकीचा आणि संविधान प्रेमी जनतेची दिशाभूल करणारा आहे, असे आनंदराज आंबेडकर यांनी या पत्रात स्पष्ट शब्दांत बजावले आहे. आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आपल्या रॅलीमध्ये कोणीही सहभागी होऊ नये अशी ताकीद वंचितच्या प्रदेश पदाधिकाऱयांनी अमरावतीमधील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्याची खात्रीशीर माहिती आपल्या हाती आली असल्याचे सांगत आनंदराज आंबेडकर यांनी वंचितच्या दुटप्पीपणाचा एकप्रकारे या पत्राद्वारे पर्दाफाश केला आहे.

माघारीच्या निर्णयात किंचितही बदल होणार नाही

आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज मागे घेऊ नये आणि उमेदवारी कायम ठेवावी, अशी विनंती वंचित च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी यांनी केली होती. त्यावर रेखा ठाकूर यांना पत्र पाठवून उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयात किंचितही बदल होणार नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. संविधान प्रेमी जनतेची पुन्हा एकदा मतविभागणी होऊन भाजपा सरकार येऊ नये म्हणून रिपब्लिकन सेनेने निर्णय घेऊन माझी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.