गुलदस्ता – अद्वितीय प्रतिभेची भेट

>> अनिल हर्डीकर

विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमाताई यांनी त्यांच्या ‘रास’ या आत्मकथनपर पुस्तकात विंदा करंदीकर आणि आरती प्रभू यांच्या खरोखर झालेल्या भेटीच्या प्रसंगाचं वर्णन केलं आहे. अद्वितीय प्रतिभा लाभलेल्या दोन दिग्गजांची ही भेट.

सुप्रसिद्ध लेखकांच्या पत्नींनी आत्मकथन केलेली अनेक पुस्तके मराठी साहित्यात उपलब्ध आहेत. सुनीता देशपांडे यांचं ‘आहे मनोहर तरी’, रणजित देसाई यांची पत्नी माधवी देसाई यांचं ‘नाच गं घुमा’, मंगेश पाडगावकर यांची पत्नी यशोदा पाडगावकर यांचं ‘कुणास्तव कुणीतरी’ ही काही वानगीदाखल उदाहरणे. सुमा करंदीकर म्हणजे विंदा करंदीकर यांच्या पत्नीने आत्मकथन केलेलं एक पुस्तक आहे, ज्याचं नाव आहे ‘रास.’

गोविंद विनायक करंदीकर हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांच्या कविता वैचारिक असूनही क्लिष्ट नसत. त्यांच्या प्रत्येक कवितेत, मग भले ती बालकविता असो त्यामध्ये विंदांची sग्gहूल्rा असे. ‘एवढे लक्षात ठेवा’ या कवितेत ते लिहितात…

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा
श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा।।
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा।।
जाणते जे सांगती, ऐकून घ्यावे ते सदा
मात्र तीही माणसे, एवढे लक्षात ठेवा।।
चिंता जगी या सर्वथा, कुणा न येई टाळता
उद्योग चिंता घालवी, एवढे लक्षात ठेवा।।
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी
सीमा तयाला पाहिजे, एवढे लक्षात ठेवा।।
दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले
तो गुरूचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा।।
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी
त्याने स्वतला जिंकणे, एवढे लक्षात ठेवा।।

विंदा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. त्यांनी विल्यम शेक्सपिअर आणि संत तुकारामाच्या काल्पनिक भेटीवर एक अद्वितीय कविता लिहिली आहे. मात्र सुमाताईंनी विंदा करंदीकर आणि तशाच प्रतिभेच्या एका कवीच्या खरोखर झालेल्या भेटीच्या प्रसंगाचं वर्णन त्यांच्या सरळसाध्या भाषेत केलं आहे. त्या लिहितात,
‘एकदा हे समुद्रावरून घरी आले. स्वयंपाकात होते. ह्यांनी मला हाक मारली व जरा बाहेर बोलावले. मी कुकर लावून बाहेर आले. हे म्हणाले, “बस, अगं आज मी समुद्रावर बसलो असताना एक चमत्कारिक घटना घडली. एक मुलगा माझ्या जवळ आला व मला म्हणाला ‘तुम्हीच विंदा करंदीकर ना?’ मी चकितच झालो. आजूबाजूला आणखी कोणी तरुण मुले दिसतात का ते पाहिले, पण कोणी नव्हते. मी त्याला विचारले, ‘तुला कुणी सांगितले?’ तो म्हणाला, ‘मला कोणी सांगितले नाही, पण का कुणास ठाऊक, तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्हीच विंदा करंदीकर असं एकदम वाटलं. मला तुमच्या कविता आवडतात. तुमच्याकडून ऐकायच्या आहेत.’ हे सर्व ऐकून मी आश्चर्यचकित झालो. तो कुडाळहून दोन दिवसांपूर्वीच इथे रत्नागिरीत आलाय. त्याला मी उद्या दुपारी घरी कविता ऐकायला बोलावलं आहे. तू घरी नसशील, शाळेत गेलेली असशील तेव्हा तू काव्य वाचनातून सुटलीस! मुलगा भाबडा आहे की बनेल आहे, कळत नाही. बघू या उद्या.”
दुसऱया दिवशी दुपारी सांगितलेल्या वेळेला तो मुलगा आला. ‘स्वेदगंगा’तील मजूर, कीर्तन, साक्षात्कार, रक्तसमाधी वगैरे व काही नव्या कविता ह्यांनी त्याच्यासाठी वाचल्या. तो स्वत ही कविता करत असला तरी ह्यांनी आग्रह केल्यावरही त्याने आपल्या कविता वाचून दाखवल्या नाहीत. हा वृत्तांत मला घरी आल्यावर समजला.
हे असो, पण नंतर असं समजलं की, रत्नागिरीला आलेला अठरा-एकोणीस वर्षांचा हा तरुण मुलगा
मॅट्रिकच्या परीक्षेसाठी कुडाळहून आला होता आणि त्या दिवशी परीक्षेच्या पेपराला न जाता तो कविता ऐकत बसला. त्या मुलाचं आडनाव होतं खानोलकर. चिं. त्र्यं. खानोलकर म्हणजे कवी आरतीप्रभू.
हा कवितेचा वेडा मुलगा पुढे सर्वार्थाने मोठा झाला आणि त्याने लिहिल्या अनेक कविता. त्याची गाणी झाली आणि आपण अजूनही गुणगुणत आहोत.

येरे घना, येरे घना, न्हाऊ घाल माझ्या मना ।।
फुले माझी अळूमाळ। वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना ।।
टाकुनिया घरदार, नाचणार नाचणार
नका नको म्हणताना, मनमोर भर राना ।।
नको नको किती म्हणूण्वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाटय़ाचा, वारा मला रसपाना।। येरे घना…