कॅनडात खलिस्तानी आक्रमक, पुन्हा मंदिरावर हल्ला; प्रवेशद्वारावर इशारा देणारे पोस्टर्स लावले, तणाव वाढला

कॅनडामध्ये हिंदूंच्या धार्मिक स्थळांना खलिस्तानवाद्यांकडून सातत्याने लक्ष्य केले जात आहे. ब्रिटिश कोलंबियामध्ये खलिस्तानवाद्यांनी शनिवारी रात्री उशिरा लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली आणि मुख्य प्रवेशद्वारावर खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरचे छायाचित्रही लावण्यात आले आहे. कॅनडात खलिस्तानवाद्यांकडून मंदिराची तोडफोड करण्याची ही तिसरी घटना आहे. पोस्टरद्वारे हरदीप निज्जरच्या हत्येतील हिंदुस्थानच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निज्जर हा फुटीरतावादी संघटनेचा खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. 18 जून रोजी कॅनडातील गुरुद्वारामध्ये दोन अज्ञात लोकांनी त्याची हत्या केली होती. यामागे हिंदुस्थानचा हात असल्याचा खलिस्तानींचा दावा आहे. निज्जरच्या हत्येवर शिख फॉर जस्टिसने जारी केलेल्या पोस्टरमध्ये कॅनडातील हिंदुस्थानी दूतावासातील अधिकाऱ्यांची छायाचित्रे आहेत. पोस्टरवर लिहिले आहे की, जे त्यांच्या घराचा पत्ता सांगतील त्यांना 10 हजार अमेरिकन डॉलर्स दिले जातील.निज्जरच्या हत्येप्रकरणी आम्ही फौजदारी खटला चालवू, असे पोस्टरमध्ये लिहिले आहे. शिख फॉर जस्टिसच्या नावाने अमेरिकेतील वॉशिंग्टन येथून जारी करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये कॅनडातील ओटावा, व्हँकुव्हर आणि टोरंटो येथील निज्जरच्या मारेकऱ्यांच्या घरांचे पत्ते सांगणाऱ्यांना बक्षीस देण्यात येईल, असेही लिहिले आहे. त्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कॅनडात निज्जरच्या हत्येप्रकरणी फौजदारी प्रक्रियेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोस्टरवर कॅनडातील हिंदुस्थानचे उच्चायुक्त संजय वर्मा, कौन्सिल अपूर्व श्रीवास्तव आणि मनीष यांची छायाचित्रे आहेत.

खलिस्तानी पन्नू कॅनडातील अधिकाऱ्यांना बक्षिसांचे आमिष दाखवून दहशत निर्माण करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदुस्थानचा मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या कॅनडात हत्येनंतर शिख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने किल इंडिया नावाचे पोस्टर प्रसिद्ध केले होते. हे पोस्टर केवळ कॅनडातच नाही तर कॅनडासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इंग्लंडमध्येही रिलीज करण्यात आले. यामध्ये संबंधित देशांतील हिंदुस्थानी दूतावासातील अधिकाऱ्यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. या घटनांमुळे कॅनडामध्ये तणावाचे वातावरण आहे.