Nitin Desai Suicide – आधुनिक युगाचा विश्वकर्मा

सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा अडीच दशकात जागतिक कीर्तीचा कर्तबगार कलादिर्ग्शक, प्रोडक्शन डिझायनर बनतो आणि  जगप्रसिद्ध एन. डी. स्टुडिओचा मालक बनतो, हा नितीन चंद्रकांत देसाई यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. नितीन देसाई म्हणजे आधुनिक युगाचा विश्वकर्मा. याच नावाने त्यांचा चरित्रग्रंथही प्रकाशित झालेला आहे.

ठाण्यात 1965 साली जन्मलेल्या देसाई यांचे बालपण मुंबई आणि कोकणात गेले. दापोलीजवळील पाचवली गावातील निसर्ग त्यांच्यातील कलाकाराला घडवण्यास कारणीभूत ठरला. शालेय शिक्षणानंतर रहेजा व जे.जे. या कला महाविद्यालयातून शिक्षण घेतले. सुरूवातीला त्यांनी प्रख्यात कलादिग्दर्शक नितीश रॉय यांच्याकडे कलादिग्दर्शनाचे धडे गिरवले. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘तमस’, ‘चाणक्य’, ‘मृगनयनी’ यांसारख्या मालिकांसाठी त्यांनी कलादिग्दर्शन केले. ‘परिंदा’, ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटांसाठीही त्यांनी नितीशदांना सहाय्य केले. ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटापासून स्वतंत्रपणे कलादिग्दर्शन करू लागले. या चित्रपटातील भव्य सेट्सनी सर्वांचे डोळे दिपवून टाकले आणि नितीन देसाई या नावाची जादू सगळीकडे पसरायला सुरुवात झाली. ‘खामोशी द म्युझिकल’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘द लिजंड ऑफ भगतसिंह’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘ट्रफिक सिग्नल’, ‘जोधा अकबर’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘सलाम बॉम्बे’, ‘बुद्धा’, ‘जंगल बुक’, ‘कामसूत्र’, ‘सच अ लाँग जर्नी’, ‘होली सेफ’ या हॉलीवूडपटांसाठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले.

कलादिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार

तब्बल चार चित्रपटांसाठी त्यांना कलादिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटांखेरीज दूरदर्शन मालिकांसाठी, तसेच ‘गेम शोज’साठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले. ‘कौन बनेगा करोडपती’साठी देसाई यांनी उभारलेला सेट खूप गाजला. कलादिग्दर्शनामध्ये यश मिळाल्यानंतर देसाई यांनी चित्रपटांच्या आणि मालिकांच्या निर्मितीकडे मोर्चा वळवला. ‘राजा शिवछत्रपती’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका. त्यांनी ‘बालगंधर्व’ चित्रपटाचीही निर्मिती केली. ‘अजिंठा’ चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनात उतरले.

नितीन देसाईंचे जाणे अत्यंत दुःखदायक आहे. प्रचंड आत्मविश्वास, नाविन्याची ओढ आणि मेहनत करण्याची तयारी  असलेला एक उमदा मराठी उद्योजक आपण गमावला. मराठी सिनेसृष्टीबरोबरच सर्वच क्षेत्राला बसलेला हा मोठा धक्का आहे.

शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

मराठी, हिंदी कलासृष्टीत आपल्या कलेच्या माध्यमातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या नितीन देसाई यांचे जाणे चटका लावणारे आहे. टेंभी नाक्याची देवी आणि नितीन देसाई यांचे वेगळे ऋणानुबंध होते. धर्मवीर आनंद दिघे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांनी कायम जपली. इतका उमदा माणूस आणि मित्र गमावल्याचे वृत्त वेदनादायी आहे.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नितीन देसाई इतिहासातील बारकाव्यासह सेट्स उभारायचे. अक्षरशः ऐतिहासिक कालखंड उभा करायचे. ‘देवदास’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी रात्रंदिवस आम्ही त्यांच्या सेटमध्ये काम करायचो. सेट बघायला लोक दुरदुरून यायचे. खूप महान आर्ट डायरेक्टर आपल्यातून निघून गेले.

मिलिंद गुणाजी, अभिनेते

महाराष्ट्राच्या कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी निकटचे, मित्रत्वाचे संबंध असलेल्या नितीन देसाईंचे अशा पद्धतीने अचानक निघून जाणे अनाकलनीय, अविश्वसनीय, मनाला चटका लावणारे आहे.  मी नितीन देसाईंच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

कलाक्षेत्रातील माझ्या आजवरच्या प्रवासात मला लाभलेले दादांचे मार्गदर्शन आणि साथ खूप मोलाची ठरली आहे. ज्या ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्या मालिकेचे निर्माते नितीनदादाच होते. ही मालिका म्हणजे त्यांचा ध्यास होता.

डॉ. अमोल कोल्हे, अभिनेते, खासदार

 ‘कटय़ार काळजात घुसली’ हा चित्रपट नितीनदादांसोबत केला. आता ‘मानापमान’ करतोय. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले.  ‘कटय़ार’च्या मुहूर्ताच्या वेळी ते खास शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सुबोध, चल एकत्र काहीतरी करूया, असे ते नेहमी म्हणायचे.

   सुबोध भावे, अभिनेते

‘ट्रफिक सिग्नल’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘इंदु सरकार…’ यापैकी तीन चित्रपट एन. डी. स्टुडिओत केले. चित्रपट लहान आहे की मोठा याचा त्यांनी कधी विचार केला नाही. दादांनी नेहमीच नव्या-जुन्या लोकांना सहकार्य केले. ‘ट्रफिक सिग्नल’च्या वेळी आम्ही महिनाभर स्टुडिओत होतो. दादांना कधीच विसरता येणार नाही.

मधुर भांडारकर, दिग्दर्शक

पुण्यातील दोन ‘वसंतोत्सकां’साठी त्यांनी भव्य आणि अप्रतिम असे सेट्स उभारले होते. आजही त्या सेट्सची आठवण अनेकदा निघते.  मला अभिनय जमू शकतो, हा हुरूप मला नितीन देसाई यांनीच दिला.

राहुल देशपांडेराष्ट्रीय पुरस्कारकिजेते गायक

दिल्लीतील पथसंचलनात महाराष्ट्राचा अभिमान

भव्यता, दिव्यता आणि ऐतिहासिक कलेच्या माध्यमातून कलाकृती अजरामर करणारे देसाई यांचा जगभरात बोलबाला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील होणाऱया पथसंचलनात महाराष्ट्रातील कला व संस्कृतीचे दर्शन आपल्या कलादिग्दर्शनातून देसाई यांनी देशवासीयांसह जगासमोर मांडले.