पावसाळी आजारांपासून सावध रहा

> डॉ. सम्राट शाह

पावसाळय़ामध्ये पाणी सहसा अस्वच्छ असते. साचलेले घाणेरडे पाणी अनेक जीवजंतूंच्या प्रजननास उपयुक्त ठरते. या जिवाणूंमुळे जलजन्य आजार पसरतात.

पावसाळय़ात पाण्यामुळे होणारे आजार कोणते?
टायफॉइड : हा साल्मोनेला टायफी या जिवाणूमुळे होणारा आजार असून दूषित पाण्याद्वारे पसरणारा एक जीवघेणा संसर्ग ठरतो. पावसाळय़ात हा आजार मोठय़ा प्रमाणात आढळून येतो.

कॉलरा : हा एक असा संसर्गजन्य रोग, ज्यामुळे अतिसारासारखी समस्या उद्भवते. ज्यामुळे निर्जलीकरण होऊन गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

आमांश : आमांश असलेल्या व्यक्तीला ताप, डिहायड्रेशन, मळमळ आणि अगदी पोटात पेटके येतात. अस्वच्छ पाण्यामुळे हा संसर्ग होतो.

हिपॅटायटिस ए : हा यकृताचा संसर्ग आहे, जो दूषित पाण्यामुळे किंवा एखाद्या पांमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर होतो. कावीळ, उलटय़ा होणे, भूक न लागणे, पुरळ उठणे आणि ताप येणे ही त्याची काही ठरावीक लक्षणे आहेत.

पावसाच्या पाण्यामुळे निसरडा फुटपाथ, इमारतीच्या आवारातील परिसर, जिने निसरडे झाल्याने सर्व वयोगटांतील लोकांना फ्रॅक्चर किंवा जखमा होतात. विजेचे खांब आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी असलेल्या इलेक्ट्रिक प्लगमुळे विजेचे अपघात घडू शकतात. फ्लू, खोकला, सर्दीसारखा सामान्य संसर्ग गर्भवती महिलांमध्ये आढळून येऊ शकतो.

पावसाळय़ातील आजार कसे टाळायचे?
हातांची स्वच्छता राखा : असे केल्याने तुम्हाला या धोकादायक परिस्थितींपासून मुक्तता मिळेल. चेहऱयाला स्पर्श करण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर तुमचे हात स्वच्छ धुवा.

साचलेल्या पाण्यापासून दूर रहा : साचलेल्या पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पाणी साचू देऊ नका.

सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा : आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवल्याने संसर्गजन्य आजार टाळण्यास नक्कीच मदत होईल.

उकळलेले पाणी घ्या : पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी गाळून व उकळून थंड केलेले पाणी प्या.

खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवा. आजारी व्यक्तींपासून दूर रहा. फ्लू आणि न्यूमोनियासाठी लसीकरण करून घ्या. गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यानंतर महिलांसाठी फ्लूची लस आवश्यक असते. ती घ्यायला विसरू नका.

(लेखक अपोलो स्पेक्ट्रा, पुणे येथे इंटर्नल मेडिसीन एक्स्पर्ट आहेत)