विमुक्ता- दडपशाहीच्या विरोधात एल्गार

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

स्त्रियांच्या हक्कासंदर्भात जगभरात जी जागृती सुरू आहे त्यामध्ये इराणी महिलांचा लढा अत्यंत तीव्र, दिशादर्शक आणि आश्वासक आहे. नर्गीस मोहम्मदी या मानवाधिकार कार्यकर्तीने समस्त महिलांना एक प्रेरणा दिली आहे. यंदाचे नोबेल पारितोषिक हे स्त्रियांच्या हक्कांच्या लढय़ासाठी प्रेरक ठरले आहे, स्त्रियांच्या विमुक्ततेची ती पावती आहे.

नॉर्वेजियन नोबेल पारितोषिक समितीने यंदाचा शांतता पुरस्कार नुकताच जाहीर केला. महिला हक्क, मानवाधिकार, स्वातंत्र्य मूल्याचं संरक्षण करणारी, धर्म आणि रीती-भातींच्या नावाखाली होणाऱया स्त्रियांच्या शोषणाविरोधात आवाज उठवणारी इराणची नागरिक पत्रकार, कार्यकर्ती नर्गीस सफी मोहम्मदी यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला. नर्गीस मोहम्मदी सध्या तुरुंगात आहेत, किंबहुना त्यांची हयातच तुरुंगात गेली असं म्हटलं तर ते जास्त योग्य ठरेल. महिला, राजकीय कैदी आणि मानवाधिकार यांच्यासाठी विविध चळवळी करणाऱया, तीव्र निषेध नोंदवणाऱया आणि त्यांनी सुरू केलेल्या चळवळीच्या ठिणगीमुळे संपूर्ण इराणमधील महिलांना प्रेरणा देणाऱया नर्गीस या अत्यंत प्रभावी आणि धाडशी कार्यकर्त्या आहेत. एका धर्मनिष्ठ देशामध्ये धर्माच्या नावाखाली स्त्रियांचे शोषण आणि दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवणे ही सोपी गोष्ट नव्हे. तिच्या अपराधासाठी तिला 154 फटक्यांचे शिक्षा आणि 13 वेळा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली आहे. गेल्या 31 वर्षांपासून तुरुंगात असणाऱया नर्गीस यांनी तुरुंगात राहूनही आपली चळवळ सुरूच ठेवली. नर्गीसच्या प्रेरणेमुळे संपूर्ण इराणमध्ये दडपशाहीविरोधात कार्यकर्त्यांची एक लाटच निर्माण झाली. यासाठीच नर्गीस मोहम्मदी यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. दुर्दैवाने हा पुरस्कार घेण्यासाठी नर्गीस जाऊ शकणार नाही. कारण त्या तेहरान येथील तुरुंगात आहेत.

51 वर्षीय नर्गीस मोहम्मदी यांनी आपला लढा 1990मध्ये सुरू केला. शिक्षण घेत असताना त्या समानतेच्या पुरस्कर्त्या आणि महिलांच्या हक्काच्या संदर्भात जागरूक कार्यकर्त्या होत्या. अभियंता म्हणून काम करत असतानाच त्या विविध वृत्तपत्रांसाठी सदर लिहीत असत. तेव्हापासूनच त्यांच्या आयुष्याचे एक वेगळे वळण सुरू झाले. नर्गीस मोहम्मदीचा जन्म (21 एप्रिल 1972) जांजन येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. आई स्वत कार्यकर्त्या होत्या आणि 1979च्या इराणमधील उठावामध्ये आई आणि मामा यांना अटक करण्यात झाली आणि नंतर फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या घटनेमुळे अस्वस्थ असणाऱया नर्गीस मोहम्मदी यांनी आपली वाट तेव्हाच निश्चित केली असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

2003मध्ये तेहरान येथील ‘डिफेंडर्स ऑफ ह्युमन राइट्स सेंटर’ या एनजीओसोबत नर्गीस मोहम्मदी यांनी कार्य करायला सुरुवात केली. ही संस्था पहिल्या इराणी नोबेल पारितोषिक विजेत्या आणि शांततेच्या कार्यकर्त्या शिरीन इबादी यांनी स्थापन केली होती. आज नर्गीस इराणमधील संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत. मानवाधिकार आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणाऱया या एनजीओवर सध्या इराणने बंदी घातली आहे. सरकारच्या विरोधात काम करत असल्याच्या दोषामुळे त्यांना 2011मध्ये पहिल्यांदा तुरुंगवास झाला, हा तुरुंगवास दीर्घ मुदतीचा होता. मात्र दोनच वर्षांत त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. बाहेर आल्यानंतर देहदंडाच्या शिक्षेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. फाशीची शिक्षा ही मानवाधिकार मूल्यांच्या विरोधात आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे 2015मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.

नर्गीस यांचा 1999मध्ये विवाह झाला, पती तागी रहमानी हेदेखील महिला हक्क कार्यकर्ते होते. त्यांनाही 14 वर्षांचा कारावास भोगावा लागला आहे. या दांपत्याला दोन जुळी मुले आहेत आणि त्यांचे पती मुलांसह सध्या फ्रान्स येथे वास्तव्याला आहेत. गेल्या आठ वर्षांमध्ये त्यांनी आपल्या मुलांना पाहिलेदेखील नाही.

नर्गीस यांचा महिलांच्या दडपशाहीच्या विरोधात सातत्याने आवाज उठवल्याबद्दल विविध प्रकारे छळ करण्यात आला. अनेक हालअपेष्टा, यातना त्यांना सहन कराव्या लागल्या. त्यात त्यांच्या आरोग्याची प्रचंड हेळसांड झाली. 31 वर्षांच्या तुरुंगवासात त्या सातत्याने विविध चळवळींमध्ये नेतृत्व करत राहिल्या. आपल्यासोबत तुरुंगातील कैद्यांना एकत्रित करून आपला लढा तुरुंगातूनही सुरूच ठेवला. राजकीय कैद्यांचा, त्यातल्या त्यात महिलांचा, सरकारतर्फे होणारा पद्धतशीर वापर आणि लैंगिक शोषण याविरोधात त्यांनी तुरुंगातही आपला लढा सुरू ठेवला. त्यांच्या या सरकारविरोधी कारवायांमुळे त्यांच्यावरील निर्बंध अधिक कडक करण्यात आले. त्यांना कोणाशीही भेटू-बोलू दिले जात नाही. त्यांना येणारे दूरध्वनी कॉलही त्यांना दिले जात नाहीत. एक प्रकारे अज्ञातवासाचे जीवन त्या जगत आहेत. ‘व्हाईट टॉर्चर’ नावाचे पुस्तक त्यांनी तुरुंगवासात असतानाच लिहिले. या पुस्तकात कैद्यांवर होणाऱया अत्याचार, छळ याबद्दल लिहिले आहे.

इराणमधील नियमांनुसार इस्लाम धर्मीय स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना हिजाब परिधान करणे बंधनकारक आहे. हिजाब घालताना सर्व केस, चेहरा पूर्णपणे झाकला गेला पाहिजे, असा नियम आहे. आधुनिक महिलांना हे जाचक नियम मान्य नाहीत. त्यांनी हिजाब घालणे एकतर बंद तरी केले किंवा आधुनिक पद्धतीने हिजाब घालू लागल्या. प्रस्थापित धर्मनिष्ठ पुराणमतवाद्यांना आधुनिक महिलांचे हे वागणे मान्य नव्हते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात महासा अमिनी या 22 वर्षीय तरुणीला चेहरा पूर्ण झाकला नाही या आरोपाखाली पोलिसांनी मारहाण केली. तिला अटक करण्यात आली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने व्यथित झालेल्या नर्गीस मोहम्मदी यांनी त्यासंदर्भात एक लेख ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला पाठवला आणि इराणमधील महिलांमध्ये जागृती निर्माण झाली. लेखामुळे महिलांवर होणारा अत्याचार जागतिकरित्या चव्हाटय़ावर आला. जगभरातील महिलांनी इराण सरकारचा निषेध केला, जागोजागी निषेध मोर्चे निघाले. त्यातच धर्म परंपरा आणि रीतीभाती या नावाखाली महिलांच्या होणाऱया शोषणाच्या विरोधात इराणी महिला रस्त्यावर उतरल्या, त्यांनी आपले लांबसडक केस कापले आणि सामूहिक निषेध नोंदवणारे मोर्चे काढले. हिजाबविरोधातील ही मोठी सर्वात चळवळ असल्याचे म्हटले जाते. ही चळवळ केवळ हिजाबपुरती मर्यादित नसून मानवी हक्कांसाठी आहे. आज जगभरात इराणमधील महिलांचा लढा ‘महासा अमीन निषेध’ या नावाने प्रसिद्ध आहे. हा लढा नर्गीस यांच्या नेतृत्वामुळे अधिक ािढयाशील झाला असे मानण्यात येते.

[email protected]
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत)