लेख – ‘वॅगनर’ बंडाचा युक्रेन युद्धावर परिणाम

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना युक्रेनवरील आक्रमण हाताळता आले नाही आणि त्यांच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या ‘देशद्रोही बंडखोरां’नाही शासन करता आले नाही. रशियात झारचे शासन आणि सोव्हिएत सरकार आंतरिक घडामोडीतून उलथवले गेले. तसेच पुतीन यांच्या बाबतीतही घडू शकते. अशा प्रकारच्या सत्ताबदलांना कारणीभूत असते ती देशांतर्गत अराजकता आणि अकार्यक्षम नेतृत्व! रशियन सरकारने असे जाहीर केले आहे की, ज्यांना युक्रेन लढाईमध्ये भाग घ्यायचा नसेल ते युद्धभूमीवरून परत जाऊ शकतील. त्यामुळे वॅगनर पुन्हा युक्रेन युद्धात सहभागी राहणार की आणखी कुठे जाणार याविषयी स्पष्टता नाही.

रशियातील खासगी सैन्य ‘वॅगनर ग्रुप’ने देशाविरुद्ध उठाव केला, त्यांनी रोस्तोव-ऑन-डॉन शहर कह्यात घेतले, सैन्यतळावरही ताबा मिळवल्यानंतर मॉस्कोच्या दिशेने त्यांनी कूच चालू केली होती. मात्र बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी मध्यस्थी करून ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्याशी बोलणी केली अन् ‘वॅगनर’ने मॉस्कोकडे कूच करणे थांबवले. त्यामुळे रशियात होऊ शकणारा भयानक रक्तपात आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना असलेला धोका तूर्तास टळला.

रशियाचे एक खासगी सैन्य आहे, ज्याला ‘वॅगनर ग्रुप’ म्हटले जाते. या ग्रुपमध्ये निवृत्त सैनिकांचा समावेश आहे. त्याचा प्रमुख हा एक माजी सैनिक आहे. त्याच्याकडे आज 20 ते 25 हजार सैनिक आहेत. या सैनिकांचा युक्रेन युद्धामध्ये मोठय़ा प्रमाणात सहभाग आहे. रशिया-युक्रेन युद्धामध्ये रशियाचे दोन ते अडीच लाख सैन्य सहभागी झाले आहे. असे असूनही 16 महिने होऊनही रशियाला हे युद्ध जिंकता आले नाही. रशियाचे सैनिक लढायला सिद्ध नाहीत. रशिया केवळ दुरून शस्त्रांचा मारा करून हे युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याला हे युद्ध जिंकणे जड जात आहे. युद्ध जिंकण्यासाठी पायदळ, इन्फंट्री यांच्या सहाय्याने जवळून लढाई केली जाते आणि त्यासाठी रशियाचे सैन्य सिद्ध नाही. याचे मुख्य कारण म्हणजे रशियाचे सर्व सैनिक तरुण असून ते केवळ चार वर्षांसाठी सैन्यामध्ये येतात. त्यांना पुढे जाऊन दुसरे करीअर चालू करायचे असते. त्यामुळे ‘‘या युद्धात आपण का मरावे?’’ असे त्यांना वाटते. अशा वेळी रशियाच्या प्रमुख सैनिकी अधिकाऱ्यांना क्षेपणास्त्रे किंवा आधुनिक शस्त्रे वापरणे आणि मानसिक युद्ध करणे यांखेरीज दुसरा पर्याय नाही.

प्रारंभी रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटले की, त्यांच्याकडे मोठे सैन्य आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे. ते पाहून युक्रेन  घाबरेल अन् त्वरित आत्मसमर्पण करील; पण तसे झालेले नाही. गेले 16 महिने ही लढाई चालू आहे. मात्र प्रमुख अधिकारी व्लादिमीर पुतीन यांना आपण जिंकत आहोत, अशी खोटी माहिती देत आहेत. रशियाच्या सैन्यासमवेत ‘वॅगनर ग्रुप’चे सैनिक अधिक चांगल्या पद्धतीने लढत आहेत.

‘वॅगनर ग्रुप’ आणि रशियाचे सैन्य यांच्यात गंभीर वाद आहेत. युक्रेन युद्धामध्ये ‘वॅगनर ग्रुप’ला बऱ्यापैकी यश मिळाले यात कुणाच्याही मनात शंका असू नये; परंतु 20-25 हजार सैन्य कधीही दोन-अडीच लाख सैन्याची जागा घेऊ शकत नाही. आता ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियाचे सैन्य त्यांच्यावर आक्रमण करत आहे, असा आरोप केला. रशियाच्या सैन्याने हा आरोप फेटाळला. जेथे जेथे अर्धसैनिक दले आहेत, ते आमच्या बाजूने येत आहेत, असे ‘वॅगनर ग्रुप’चे म्हणणे होते. त्यांच्या मते ते अतिशय लोकप्रिय असून लोक त्यांना सहकार्य करत होते. रशियाच्या सैन्याच्या मते ‘वॅगनर ग्रुप’ने बंड केले होते. त्यांनी काळ्या समुद्रावर असलेले एक महत्त्वाचे शहर कह्यात घेतले होते. याचा अर्थ रशियाचे सैन्य आणि ‘वॅगनर ग्रुप’ यांच्यात एक गृहयुद्ध चालू होते.

सध्या रशियाच्या सैन्यामध्येच वाद आहे. त्यामुळे रशियाच्या सैन्याचे की ‘वॅगनर ग्रुप’चे ऐकायचे? या चक्रव्यूहामध्ये पुतीन अडकले होते. त्यामुळे युक्रेन युद्धातील रशियाच्या सैन्याची क्षमता अतिशय न्यून होणार आहे. असे म्हटले जाते की, युक्रेनचे सैन्य प्रतिआक्रमण करत आहे. त्यामुळे यात युक्रेनच्या सैन्याला थोडे यश मिळू शकते आणि रशियाच्या सैन्याला अधिक माघार घ्यावी लागू शकते. त्यामुळे पुढील घटनांकडे आपल्याला लक्ष ठेवणे आवश्यक आहे. एक मात्र निश्चित की, या वादामुळे रशियाची फार मोठी हानी होणार आहे.

परवाच्या बंडानंतर तर पुतीन यांचे वॅगनर गटावर नियंत्रण आहे का? याविषयीच शंका उपस्थित होते. ज्यांचा उल्लेख पुतीन ‘देशद्रोही’ आणि ‘खंजीर खुपसणारे’ असा करतात, त्यांची अखेर मृत्युदंडातूनच होणार हे निश्चित असते, पण प्रिगोझिन आणि वॅगनर यांच्या बाबतीत ते घडले नाही. बेलारूसचे पुतीनधार्जिणे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी मध्यस्थी करून प्रिगोझिन आणि वॅगनरला बेलारूसमध्ये सामावून घेतले. मध्यस्थी ही तुल्यबळ संघटनांमध्ये केली जाते. याचा अर्थ प्रिगोझिन बलवान झाले की पुतीन कमुकवत झाले? ‘वॅगनर’विरुद्ध देशद्रोहासारखे गंभीर आरोप मागे घेत असल्याचे रशियातर्फे जाहीर करण्यात आले आहे. मग बंड घडलेच नाही का? या सगळ्या घटना पुतीन यांची सत्तेवरची पकड खिळखिळी झाल्याचे स्पष्ट दर्शवतात.

पुतीन यांना युक्रेनवरील आक्रमण हाताळता आले नाही आणि त्यांच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या ‘देशद्रोही बंडखोरां’नाही शासन करता आले नाही. रशियात झारचे शासन आणि सोव्हिएत सरकार आंतरिक घडामोडीतून उलथवले गेले. तसेच पुतीन यांच्या बाबतीतही घडू शकते. अशा प्रकारच्या सत्ताबदलांना कारणीभूत असते ती देशांतर्गत अराजकता आणि अकार्यक्षम नेतृत्व!

रशियन सरकारने असे जाहीर केले आहे की, वॅगनर ग्रुपने युव्रेन लढाईमध्ये दिलेल्या योगदानामुळे त्यांच्याविरुद्ध कुठलीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाही. ज्यांना युक्रेन लढाईमध्ये भाग घ्यायचा असेल, त्यांनी रशियन सैन्याच्या नेतृत्वाखाली आपली कारवाई करावी. इतरांना ज्यांना परत जायचे आहे ते युद्धभूमीवरून परत जाऊ शकतील.

जगात संघर्ष क्षेत्रे किंवा कॉन्फ्लिक्ट झोन्स अनेक आहेत, जिथे ते जाऊ शकतील. मात्र वॅगनरविषयी आणि स्वतःच्या भवितव्याविषयी चिंता करण्याची वेळ पुतीन यांच्यावरच आलेली आहे. वॅगनर पुन्हा युक्रेनमध्ये जाणार की आणखी कुठे जाणार याविषयी स्पष्टता नाही.

हिंदुस्थान अजूनही रशियावर संरक्षण सामग्री आणि स्वस्त इंधनाच्या बाबतीत अवलंबून आहे. रशिया पुन्हा अस्थैर्याच्या उंबरठय़ावर आहे आणि ही बाब जगाच्या चिंतेत भर टाकणारीच ठरते.

[email protected]