साहित्य जगत – या चंद्राशी कुठले नाते…

रविप्रकाश कुलकर्णी

 

अनादि काळापासून आपलं चंद्राशी नातं आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तो वेगवेगळ्या रूपात भेटत राहतो. लहानपणी तो चंदामामा  असतो तर तारुण्यात त्याला प्रियतमाच चंद्रासम भासते. प्रियतमेकडे पाहून त्याला प्रश्न पडतो, मानू कोणता चंद्रमा… असा मनामनात असलेला तो चंद्र होता आणि अजूनही आहेच…!

पण माणसाने विजिगीषू वृत्तीने चक्क चंद्रावरती पहिलं पाऊल टाकलं आणि एक नवाच चंद्र आणि त्याबरोबर नवीन स्वप्न घेऊन तो आला. पण मग आमच्या मनातल्या चंद्राचं काय? कवी कुसुमाग्रज यांनी त्याबाबत छान म्हटलंय…

त्या चंद्राचे या चंद्राचे

मुळीच नाही काही नाते

त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसोनी

माकड, मानव, कुत्रा यांना जाता येते…

या चंद्राला वाटच नाही एक नेमके ठिकाण नाही

आहे नभाचा मानकरी पण लक्ष मनांच्या इंद्रगृहातुनि भटकत राही…

असं बरंच काही सांगून कुसुमाग्रज शेवटी म्हणतात…

या चंद्राशी कुठले नाते?

त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावुनी

शास्त्रज्ञांना चढता येते

रसिका मनांना या चंद्राला पळभर केव्हा

जळात वा डोळ्यातच केवळ धरता येते

बुधवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान-3 मोहिमेतील पाम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले पाय अलगद रोवले तेव्हा लक्षावधी माणसांची मने उचंबळून आली. चांद्रयान-2 चे अपयश त्याने पुसून टाकले. चांद्रयान- 2 मोहीम काळात इस्रोचे प्रमुख डॉ. के. जीवन यांच्या वाटय़ाला आलेल्या ह्या अपयशाने ते हबकून गेले. दुःखाने त्यांचा चेहरा विदिर्ण झाला. ती बोच न जाणारीच आहे.

हे सगळं उट्टं इस्रोचे सध्याचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या कार्यकाळात फेडलं गेलं. नशीब नशीब म्हणतात ते हेच म्हणावं का?

चांद्रयान-3 ने चांद्रयान-2 चेच केवळ अपयश धुऊन काढले नाही तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरण्याचा पहिला मान या चांद्रयान- 3 मोहिमेने भारताला मिळवून दिला आहे. तसंच अमेरिका, सोव्हिएत महासंघ आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे.

अर्थात त्यामुळे साऱया जगाची दृष्टी भारताकडे पाहण्याची पार बदलून गेली हे खरंच. पण त्याचबरोबर आम्ही भारतीयदेखील काहीतरी करून दाखवू शकतो हा एक आत्मविश्वास आमच्या मनात निर्माण झाला. त्याचंच प्रत्यंतर म्हणजे देशभर नव्हे, तर जिथे जिथे भारतीय आहेत त्यांनी जल्लोष केला. ते प्रकट करण्याचा प्रत्येकाचा प्रकार वेगवेगळा. टपाल विभागाने झटपट विशेष विरूपण म्हणजे स्पेशल कॅन्सलेशन जारी केले. आयत्या वेळची ही गोष्ट असल्यामुळे हे कॅन्सलेशन कलेक्टर्स आयटम ठरणार यात शंकाच नाही.

मुंबईतील देशमुख मार्गावरील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथेदेखील मोठा पडदा लावून हे प्रक्षेपण दाखवून तेथील लोकांना या आनंदाचा लाभ देण्यात आला. (आता कोणी म्हणेल हा देशमुख मार्ग कुठे आला? तर हा पूर्वीचा पेडर रोड! पेडर रोडचं नाव देशमुख मार्ग करून जमाना झाला. पण अजूनही आमच्या तोंडात हे नाव बसलं नाही. असं का व्हावं?)

समाज माध्यमांवर तर हा आनंद इतक्या वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झाला ते पाहून थक्क व्हायला झालं. एकाने तर शब्द लिहिले…

ये चंदा न रुस का ना ये जपान का

ना ये अमेरिकन प्यारे, ये तो है हिंदुस्तान का…

हे वाचून लक्षात आलं की शैलेंद्रने ‘इंसान जाग उठा’ चित्रपटासाठी लिहिलेल्या या ओळी आहेत. भले चित्रपटात सुनील दत्त हे गाणं मधुबालाला उद्देशून म्हणतो, पण या क्षणाला चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाला या ओळी बरोबर लागू पडतात. अर्थात या क्षणी शैलेंद्रची आठवण किती जणांना आली असेल कोणास ठाऊक? या गाण्याची सुरुवात अशी आहे,

देखो रे देखो लोग अजुबा ये बीसवी सदी का…

आता 22 वं शतक संपून 23 वर्षं झाली आहेत, पण चांद्रयान 3 चे यश अजुबा वाटतं हे खरंच. हा आनंद आता दीर्घकाळ टिकला पाहिजे असा आशावाद व्यक्त करावा का?