स्वमग्नता आणि सामाजिक भान

आशिष बनसोडे / उमेद

स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम. एका दृष्टीने हे अदृश्य अपंगत्वच आहे. सगळ्याच बाबतीत कमी गती असणाऱया, अशी समस्या असलेल्या स्वमग्न व्यक्ती, त्यांचे पालक वा त्यांचे केअर गिव्हर यांना समाजाच्या मदतीची, आधाराची गरज असते. फोरम फॉर ऑटिझमसारख्या स्वयंसेवी संस्था अशा मुलांना, पालकांना मदत करण्यासोबतच समाजात याबाबत जागरुकता निर्माण करण्याचे कामही करते. त्यामुळे नागरिकांनी आता जागरूक व्हायला पाहिजे.

तो असो की ती, घराबाहेर पडल्यानंतर सगळेच सारखे दिसतात. केवळ दिसणंच नाही, तर सर्वांचं राहणीमान, वागणूक, शारीरिक हालचाली जवळपास सारख्याच असतात. यात विशेष असं काहीच नाही असा जर समज होत असेल तर काहीतरी गडबड होतेय. होय, कारण दिसतं तसं नसतं असं म्हटलं जातं ते योग्यच आहे. आपल्या आजूबाजूला वावरणाऱयांमध्ये काही जण सामान्य नागरिकांप्रमाणे दिसत असले तरी ते सामान्य नसतात. ते ‘स्वमग्न’ व्यक्तीदेखील असतात. म्हणजेच ते अदृश्य अपंगच असतात. अशांचे विश्वच वेगळे असते. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून अशा स्वमग्न व्यक्तींना ओळखून त्यांना आधार द्यायचा आहे. कारण ती काळाजी गरज बनली आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना असंख्य नागरिक आजूबाजूला दिसत असतात. त्यामुळे धावपळीच्या दुनियेत सर्वसाधारणपणे सर्वांना एकाच नजरेतून पाहिले जाते. अर्थात प्रत्येकाकडे विशेष लक्ष देण्याची किंवा कोण कसा आहे हे पाहण्याची, जाणून घेण्याची सवड कोणाकडे नसते. कोणाकडे तेवढा वेळदेखील नसतो. ही वस्तुस्थिती असली तरी एक जबाबदार नागरिक म्हणून कान आणि डोळे उघडे ठेवून वावरणे कलियुगात गरजेचे आहे. कुणास ठाऊक, आपल्या अचूक नजरेमुळे किंवा एखाद्याला समजून घेतल्याने समोरच्या अज्ञात व्यक्तीला मदतीचा हात मिळू शकेल, त्याच्या कुटुंबाला मदत मिळू शकेल. कारण समाजातील काही घटक असेही असतात की, त्यांना गर्दीतही ओळखण्याची आवश्यकता असते. कारण ते दिसायला सारखेच असले तरी ते इतरांपेक्षा वेगळे असतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘स्वमग्न’ व्यक्ती. सदैव आपल्याच विश्वात रमणारे, ना संभाषण करता येत की इतरांप्रमाणे वागता, राहता येत. त्यांची गती फारच कमी असल्याकारणाने स्वमग्न समस्या असणारे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अशा व्यक्तींना ओळखणे तसे जड जाते, पण मनात करुणा आणि थोडा संयम बाळगला तर गर्दीतही आपण अशा व्यक्तींना सहज ओळखू शकतो आणि त्यांना ओळखणं गरजेचं आहे. मायानगरी मुंबईत दररोज अनेक जण हरवतात. त्यातले बरेच जण घरीदेखील परततात. जे सज्ञान आहेत, ज्यांना घरचा पत्ता, पालकांचा मोबाइल नंबर सांगता येतो त्यांना हरवले तरी फारशी समस्या येत नाही. आपल्याकडे असलेली माहिती आाणि बोलता येत असल्याने ते इतरांच्या मदतीने सुखरूप घरी परतात. नेमकी या विपरीत अवस्था असते ती स्वमग्न लोकांची. दिसायला सर्वसामान्यांप्रमाणे असले तरी घराबाहेर पडले की, परत कसं जायचं, त्यांना समजतच नाही. कोणाशी संभाषण करता येत नाही. कोणी वाटसरू किंवा एखाद्या नागरिकाने विचारपूस केली तरी नीट बोलता येत नाही. त्यांची शरीराची हालचाल, हावभाव वेगळेच असतात. परिणामी सर्वसामान्य जनता अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करून आपला मार्ग धरते. त्यामुळे स्वमग्न लोक रस्ता भरकटतात, काय करायचे कुठे जायचे, काहीच समजत नाही. भूक लागली तरी कोणाकडे मागायचे तेदेखील त्यांना समजत नाही. त्यातील बऱयाच जणांना नैसर्गिक विधी कुठे करायचा याचेदेखील भान राहत नाही. त्यामुळे स्वमग्न व्यक्ती एकाकी पडतात. त्यातूनही कोणाचा मदतीचा हात मिळाल्यास घरी परतल्या तर ठीक, नाहीतर त्यांचे काय होते हे बऱयाच घटनांमध्ये समजून आलेले नाही.

बालकांमध्ये असलेली स्वमग्नता ही समस्या फक्त वेळेत पालकांना ओळखता आली पाहिजे. जेणेकरून एकदा आपला पाल्य स्वमग्न असल्याचे समजले की, त्याची पुढची जडणघडण त्या पद्धतीने करणे, त्याला स्वबळावर उभे करणे सोयीचे जाते. अशा व्यक्ती वयाने मोठय़ा होत गेल्या तरी इतरांप्रमाणे होत नाहीत. अशा वेळी पालकांची जबाबदारी फार महत्त्वाची ठरते. बऱयाचदा आई-बाबा आणि त्यांचे पाल्यदेखील स्वमग्न असतात. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून सर्वसामान्य जनतेनेदेखील आजूबाजूला कोणी स्वमग्न व्यक्ती आहे का, ते ओळखून त्याला मदतीचा हात दिला पाहिजे, असे फोरम फॉर ऑटिझम या सामाजिक संस्थेच्या विश्वस्त सुलेखा दोषी सांगतात. सदर संस्था ही स्वमग्नता असलेल्या लोकांच्या कुटुंबांसाठी कार्यरत असणारा एक पालक समर्थन गट आहे. सुलेखा दोषी व त्यांच्या सहकारी दर्शना सावंत या स्वमग्नता काय आणि ती कशी ओळखून संबंधितांना सहकार्य करावे यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रचंड मेहनत करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांव्यतिरिक्त ते पोलिसांनादेखील याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. शेवटी इतकेच की, माणसाने माणुसकीच दाखवली नाही तर आपले माणूसपण खुजे ठरेल. स्वमग्न व्यक्तीदेखील कोणाचे तरी मूल, भाऊबहीण, पालक असतात. ते इतरांप्रमाणे नसल्याने त्यांना आधार देणे सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्या सर्वांना ही जबाबदारी पार पाडायची आहे.

तुमच्या मदतीची गरज का आहे?
काहींना धोक्याचा अंदाज बांधता येत नाही. काही अजिबात बोलू शकत नाहीत. काहींना खूपच मदतीची गरज असते. काहींना सूचनेचे पालन करणे कठीण जाते. काही गतिमंद असू शकतात. काही उद्धट वागू शकतात. बऱयाच जणांना एखाद्या व्यक्तीविषयी समोरचा काय समजेल याचा अंदाज बांधणे कठीण जाते.

स्वमग्नतेचे प्रकार
माहितीवर प्रक्रिया न करता येणे, कार्य पार न पाडता येणे, संवेदन प्रक्रिया नसणे, एखादी क्रिया सतत करणे, मोटर कौशल्याचा अभाव, रक्षणात्मक विचाराचा अभाव, सामाजिक जाणिवेचा अभाव, शाब्दिक वा सांकेतिक संवाद न करता येणे.

स्वमग्न व्यक्ती अशा का वागतात?
त्यांना इकडे तिकडे पळायला व नवीन जागा बघायला खूप आवडते. ते बघण्यासाठी फार उत्सुक असतात आणि ते बघण्यासाठी घराबाहेरदेखील पडतात. एखाद्या तणाव देणाऱ्या परिस्थितीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना विशेष आवड असणाऱया गोष्टींच्या मागे धावतात, जसे की लोकल, बस, पाणी इत्यादी.

> [email protected]