…म्हणून केजरीवाल तुरुंगामध्ये पुरी-भाजी, मिठाई अन् आंब्यावर मारताहेत ताव, ED चा कोर्टात दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असून त्यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर गुरुवारी राउज एव्हेन्यू कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केजरीवाल वैद्यकीय जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला.

तुरुंगामध्ये केजरीवाल यांना घरचे अन्न खाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तुरुंग प्रशासनाने आम्हाला त्यांचा डाएट प्लान पाठवला आहे. त्यांना टाइम-2 चा मधुमेह आणि बीपीचाही त्रास आहे. टाइम-2 चा मधुमेह असणारा रुग्ण अशा प्रकारचे खाद्यपदार्थ खातोय हे आम्ही कधी पाहिलेले नाही.

परंतु इथे केजरीवाल रोजच तळलेले पदार्थ, मिठाई, आंबे आणि केळी खात आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढावे यासाठी केजरीवाल तुरुंगात या पदार्थांवर ताव मारत आहेत. याआधारे ते वैद्यकीय जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ईडीचे विशेष वकील जोहेब हुसैन यांनी केला.

दरम्यान, ईडीचा हा दावा अरविंद केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी फेटाळून लावला. अरविंद केजरीवाल यांना घरचे अन्न मिळू नये असा ईडीचा डाव असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. तसेच हे प्रकरण त्यांच्या आरोग्याशी निगडीत असून त्यांना दिलेल्या डाएटप्रमाणेच ते खात असल्याचे जैन म्हणाले.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने तुरुंग प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल अहवाल मागवला आहे. तसेच केजरीवाल यांच्या वकिलांकडे त्यांच्या डाएट प्लानचीही मागणी कोर्टाने केली. आता या प्रकरणावर पुढील सुनावणी शुक्रवारी (19 एप्रिल) दुपारी दोन वाजता पार पडेल.