उद्योगविश्व – ‘चवदार’ वाटचाल

>> अश्विन बापट

इन्स्टंट दडपे पोहे, लोणचेही लज्जतदार अरुण व अश्विनी जोशी दांपत्याची ‘चवदार’ वाटचाल.

सर्वांना श्रीमंत करायचं म्हणजे कोणीच शत्रू राहत नाही. मुंबईतल्या गिरगावच्या आंग्रेवाडीत राहणारे खाद्य पदार्थ व्यावसायिक अरुण जोशींचा हा फंडा. त्यांच्या प्रवासाबद्दल अधिक विचारलं असता ते म्हणाले, मी शाळकरी वयात असताना अनेक फेरीवाले इमारतीत येत असत. त्यांच्याकडे असलेली पदार्थ विकण्याची स्टाईल, त्यांच्या टोपलीतल्या पदार्थांचं वैविध्य पाहून मला आपणही असंच काहीतरी करावं असं आकर्षण वाटत होतं. पुढे कोकणातल्या वातावरणाने, तिथल्या उत्पादनांनी मला भुरळ घातली. मी 1968 ते 1970 या काळात साधारण 14-15 वर्षांचा असताना ओले काजूगर, रातांबे अशी खास कोकणी उत्पादनं आणून विकायला सुरुवात केली. गायवाडीतील कामगार ट्रान्सपोर्टमध्ये माझी मालाची डिलिव्हरी येत असे. माझ्या सोबत एस. के. हर्डीकर या चहा व्यापाऱयांचीही उत्पादने असत. त्यांना जेव्हा माझ्या या धडपडीविषयी कळलं, तेव्हा त्यांनी समोरून येऊन मला सांगितलं, तुला कधीही कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर माझ्याकडे ये. तुझा व्यवसाय मोठा कर. अशीच साथ मला माझ्या आंग्रेवाडीतील शेजारी, मित्रपरिवार यांनी दिली. आज तिथेच मी राहत्या जागेसह गोडाऊन, निर्मिती केंद्रही उभारू शकलो. शिवसेनेचे तत्कालीन नेते गजानन वर्तक यांनी जे सहकार्य मला केलं, जी साथ दिली, ती या काळात मला मोलाची होती. माझं अक्षरही सुंदर असल्याने मी बोर्ड लिहिण्याची आणखी एक आवड जोपासली. त्याचा व्यवसायही मला करता आला असता, पण लोकांच्या उत्पादनांच्या आकर्षक पद्धतीने जाहिराती केल्यास त्यांना चार पैसे मिळतील या हेतूने मी हे बोर्ड लिहिण्याचे कधीही पैसे घेतले नाहीत. अजूनही मी हे बोर्डस् लिहित असतो. 1993 पासून मोठय़ा प्रमाणात सुरू झालेल्या माझ्या या व्यवसायातील वाटचालीत पत्नी अश्विनीचाही मोलाचा वाटा आहे. तीही अनेक पाककृती उत्तम साकारते. पुरोहित बंधू, फोर्टला दुकान असलेले विश्वास बेडेकर ही मंडळी त्या त्या टप्प्यात मला भेटली. माझा व्यवसाय पुढे गेला. आज माझ्याकडे एकूण 52 उत्पादनं आहेत. लोणच्याचे आंबा, लिंबू, आंबेहळद असे प्रकार आहेत. चटण्यांचे लसूण, कढीपत्ता, शेवगा, शेंगदाणा असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. महिन्याला 30 ते 40 किलोचं लोणचं, चटणी विकली जातात. माझ्या सीझनल प्रॉडक्टमध्ये कोकम सरबत, कैरीचं पन्हं खूप लोकप्रिय आहेत. सध्या रोज 5 किलो कैरीचं पन्हं करून पी होतेय. केशर वेलची सिरपदेखील आमच्याकडे तयार केलं जातं. आंबेडाळदेखील आमच्याकडे ऑर्डरनुसार तयार करून मिळते. मुंबईत विलेपार्ले, बोरिवली, दहिसर, तर अगदी ठाण्यापर्यंतही विविध भागांत माझी उत्पादनं पोहोचतात.

अलीकडेच सुरू केलेले ‘रेडी टु इट’ दडपे पोहे चांगलेच लोकप्रिय झालेत. या पोह्यांमध्ये तुम्ही फक्त ओलं खोबरं आणि कोथिंबीर मिक्स केलीत की, चविष्ट नाश्ता तयार. सध्याच्या फास्ट लाइफमध्ये नोकरी करणाऱया गृहिणींसाठी अशी उत्पादनं फार सोयीची ठरतात. माझ्याकडे तिघेजण दैनिक भत्त्यावर उत्पादनं तयार करण्यासाठी कामावर आहेत. हे तिघेही प्रशिक्षणार्थी आहेत. म्हणजे त्यांना भत्ताही मिळतो आणि स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणजे अशीच स्वत: उत्पादनं तयार करून त्यांनीही स्वावलंबी व्हावं म्हणून माझ्याकडून सहाय्यदेखील मी करत असतो. आज तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. मराठी माणूस व्यवसायात पुढे जावा यासाठी मी नेहमी आग्रही असतो. त्याला लागेल ती मदत मी करत असतो. काही परवानग्या असो किंवा आर्थिक मदतीसाठी बँक किंवा अन्य आर्थिक तरतुदीचे विविध पर्याय असो, मी नेहमी नवउद्योजकांना गाईड करत असतो.

याशिवाय बर्थ सर्टिफिकेटसारख्या सरकारी कागदपत्रांकरिताही मी नागरिकांना वेळोवेळी मदत करत असतो. आयुष्यात पैसा मिळत असतो. माणसं कमवणं महत्त्वाचं. मराठी माणूस केवळ नोकरीवर अवलंबून न राहता उद्योग-व्यवसायात पुढे जावा, त्याचबरोबर त्याने आरोग्याकडेही लक्ष द्यावं, अशी माझी आग्रही भूमिका मी मांडत राहिलोय. आज वयाच्या सत्तरीकडे आणि व्यवसायाच्या चाळिशीकडे वाटचाल करत असताना नियमित योगासनांची कास मी धरलीय, असं अरुण जोशींनी आवर्जून सांगितलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)