Babar Azam – बाबर आझमकडे पुन्हा पाकिस्तानी संघाचे नेतृत्व, शाहीन आफ्रिदीला 3 महिन्यात डच्चू

पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने बाबर आझम याच्याकडे पुन्हा एकदा क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपविले आहे. बाबर आझमकडे वन डे आणि टी-20 संघाचे नेतृत्व सोपविण्यात आल्याची माहिती पीसीबीने दिली. त्यामुळे जून महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ बाबर आझमच्याच नेतृत्वाखाली मैदानात उतरेल.

पीसीबीने बाबर आझम आणि मोहसिन नक्वी यांच्यातील चर्चेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘बाबर आझम याच्याकडे मर्यादित षटकांचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. निवड समितीने सर्वसंमतीने केलेल्या शिफारसीनंतर पीसीबीचे चेअररमन मोहसिन नक्वी यांनी बाबर आझम याच्याकडे पाकिस्तानच्या वन डे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे’, असे कॅप्शन या व्हिडीओसोबत देण्यात आले आहे.

वन डे वर्ल्डकपमधील अपयशानंतर बाबर आझमकडून पाकिस्तानी संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधून नेतृत्व काढून घेण्यात आले  होते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) शान मसूदकडे कसोटी आणि शाहिद आफ्रिदीकडे टी-20 संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. मात्र या बदलानंतर पाकिस्तानी संघाची कामगिरी अधिकच सुमार झाल्यामुळे पीसीबीला या दोघांवरही काडीचाही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पीसीबीने बाबर आझमकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला.

बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानची कामगिरी

कसोटी – 20 सामने, 10 विजय, 6 पराभव आणि 4 सामने अनिर्णित

वन डे – 43 सामने, 26 विजय, 15 पराभव, 1 टाय आणि एका सामन्याचा काही कारणास्तव निकाल लागला नाही

टी-20 – 71 सामने, 42 विजय, 23 पराभव आणि 6 सामन्यांचा निलाक काही कारणास्तव लागला नाही.