भाजप मित्र बनून जवळ घेतो आणि अफझलखानासारखी मिठी मारतो!

 ‘भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफझलखानासारखी मिठी मारतो. पण हे चांगले नाही,’ असे सांगत ‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मित्र पक्ष भाजपच्या कुटील राजकारणावर हल्ला चढवला आहे. दरम्यान, कडू यांनी केलेली ही पहिली टीका नाही. याआधीही अनेकदा भाजप आणि मिंधेंना लक्ष्य करून नंतर त्यांच्याशी त्यांनी जुळवून घेतले आहे. त्यामुळे आताची टीका नेमपं काय अडलं म्हणून त्यांनी केली, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

‘भाजपकडून जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचं काम केलं जात आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी अचलपूर मतदारसंघात अनिल बोंडे यांना लक्ष घालण्यास सांगितलं. पण बोलून कुणी लक्ष घालत नाही. एकीकडं सांगायचं सरकारमध्ये सामील व्हा. सामील झाल्यानंतर अशी भूमिका घ्यायची. हे कुणासाठीही चांगलं नाही’ असे कडू म्हणाले. दरम्यान बावनकुळे यांनी ‘कडू आमचे मित्र आहेत. त्यांना  त्रास होणार नाही’ अशी सारवासारव केली.

जनतेसोबतही दगाफटका होऊ शकतो

बावनकुळे बोलले, काहीही करून आमदार कडू यांना पाडायचं, एकीकडे सत्तेत सहभागी होण्यासाठी फोन करतात अन् त्यानंतर अशी भूमिका घेणे योग्य नाही. आपण ज्यांच्यासोबत राहत आहोत त्यांच्यासोबत प्रामाणिक राहिले पाहिजे. आमच्यासोबत दगाफटका होऊ शकतो तर जनतेसोबतही होऊ शकतो, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.