फडणवीसांना भेटून आल्यावर राणा जोरजोरात बोलतात; बच्चू कडू स्पष्टच बोलले

आमदार बच्चू कडू आणि राणा दांपत्यातील राजकीय वाद काही नवा नाही. मात्र, या वादाला खतपाणी कोण घालतं याबाबत सूचक विधान बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज केले. देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर ते जोरजोरात बोलतात. त्यामुळे आम्हाला भीती आहे, असे कडू म्हणाले.

महायुतीतील सर्व घटक पक्षांना नवनीत राणा यांचा प्रचार करावा लागेल. जे प्रचार करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अलीकडेच केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला. कडू म्हणाले, रवी राणांनी दम दिला आहे. त्यांना घाबरावेच लागेल. उद्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. चौकशी लागू शकते. फडणवीस यांना भेटून आल्यानंतर ते जोरजोराने बोलतात. त्यामुळे आम्हाला भीती आहे. आम्ही घाबरलो असल्याने आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावे लागेल, प्रचार करावा लागेल, असा खोचक टोला कडू यांनी लगावला.

रवी राणा यांनी काय दिली धमकी…
महायुतीतील नेतेही नवनीत राणा यांचा प्रचार करतील आणि एकाच मंचावर दिसतील. जे लोक महायुतीच्या धर्माचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करायला लावू. कुणी विरोधात जाऊन प्रचार करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते.