जुन्या बसपासून बनवले हटके मोबाईल कॅण्टीन

एखादी वस्तू आपल्या उपयोगाची नसली की आपण तिला फेकून देतो. पण जुनी वस्तू ‘रिसायकल’ करून तिचा पुनर्वापर करता येतो. याचे उत्तम उदाहरण बंगळुरूमध्ये दिसून आले आहे. तिथे एका टाकाऊ बसपासून कंपनीच्या कर्मचाऱयांसाठी फिरते कॅण्टीन बनवण्यात आले आहे.

बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने त्यांच्या कर्मचाऱयांसाठी ही बस बनवली आहे. त्यासाठी बस आगारातील चार कर्मचाऱयांनी मेहनत घेतली आहे. जुन्या बसने याआधी एकूण 10 लाख 64 हजार 298 कि.मी.चा प्रवास केला आहे. बसमध्ये आता चालते-फिरते पॅण्टीन तयार झाले आहे. तिथे कर्मचाऱयांना सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण मिळते. या विशेष बसचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत असे दिसते की, कॅण्टीनमध्ये खुर्च्या, टेबल व्यवस्था, पंखा, सोईस्कर वॉश बेसीन अशा सुविधा आहेत. व्हेंटिलेशन आणि प्रकाश व्यवस्थाही आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून या खास उपक्रमाचे आणि पॅण्टीनच्या रचनेचे कौतुक करत आहेत.