बाप्पाच्या आगमनात अजूनही धोकादायक फांद्या, बेवारस वाहने; तातडीने कार्यवाही करण्याची मागणी

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे मोठमोठय़ा मूर्ती मंडपाकडे रवाना होत असताना मुंबईच्या विविध भागांत अजूनही झाडांच्या धोकादायक फांद्या, बेवारस वाहने  आणि बेकायदा पार्पिंगचा प्रश्न जैसे थेच आहे. याबाबत पालिका प्रशासनासोबत गणेशोत्सव समितीच्या वारंवार झालेल्या बैठकांमध्ये आश्वासन दिले गेले आहे, मात्र अनेक ठिकाणी अद्याप कार्यवाही होत नसल्याने मंडळांकडून संताप व्यक्त होत आहे. 

गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंडपांच्या ठिकाणी लांबच लांब रांगा लागतात. बाजारात गर्दी असल्याने मोठय़ा प्रमाणात वाहतूककाsंडी होते. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून बेवारस वाहने हटवणे, बेकायदा पार्पिंगवर कारवाई करणे आवश्यक असते. मात्र याकडे अजूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी मुंबई स्वच्छसुंदर बनवण्यासाठी ठिकठिकाणी साचलेला कचरा, डेब्रिज हटवणे आवश्यक आहे, मात्र अनेक ठिकाणी कचरा, डेब्रिजचे ढीग असलेले दिसतात. यामध्ये कुर्लाअंधेरी रोड, सफेद पूल, डिसोझा पंपाऊंड, अंधेरी पूर्व, साकीनाका पोलीस ठाणे आदी भागात ही समस्या मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. 

सौंदर्यीकरणाचा रंग उतरला 

मुंबई सौंदर्यीकरणाच्या नावाखाली पालिकेने 1700 कोटींची सौंदर्यीकरणाची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये झाडे, भिंती, रस्त्याच्या दुतर्फा लायटिंग, झाडांवर लायटिंग, वाहतूक बेटांवर लायटिंग, सुशोभीकरण करण्यात आले. मुंबईत झालेल्या जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा झगमगाट मोठय़ा प्रमाणात करण्यात आला. मात्र गणेशोत्सवाच्या तोंडावर पालिकेने सौंदर्यीकरणाचा रंग उतरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पालिकेने गणेशोत्सवासाठी जी-20 प्रमाणे कामे करावी, अशी मागणी गणेशोत्सव समितीकडून करण्यात आली आहे.