पौष्टिक चारोळी

अभय मिरजकर

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तयार करण्यात येणाऱ्या मसाले दुधात जो महत्त्वाचा घटक हवाच असतो तो म्हणजे चारोळी! या चारोळीचे झाड लातूर जिह्यातील दुर्मिळ वृक्षात मोडले जाते. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिह्यामध्ये आणि खान्देशमध्ये चारोळीचे वृक्ष आढळतात. त्याचप्रमाणे  कर्नाटकातील बेळगाव जिह्यातील जंगलातही चारोळी वृक्ष आहेत असे सांगितले जाते.

चारोळी, चार, चिरौंजी अशा नावांनीही याची ओळख आहे. या झाडांच्या बियांनाच खरे तर ‘चारोळी’ व झाडाला ‘चार’ म्हणतात. झाड 25 फूट उंच वाढते. पाने काजूच्या पानासारखी असून झाडाची साल काळी, करडी व ती चौकोनी आकाराच्या  खवल्यांनी  विभागलेली असते. सुका मेवा, रानमेवा म्हणूनही याची ओळख आहे. याची फळे करवंदा एवढी असतात. फळे कच्ची असताना हिरवी  आणि पिकल्यानंतर ती काळी होतात. पिकलेली ही फळे गोड लागतात. फळांचा गर गोड असून आत कठीण कवच असते. कवचाच्या आत गोडंबी असते. या बियांनाच चारोळी म्हणतात. बिया गोल, चपटय़ा, नरम व चवीला काजूसारख्या लागतात. चारोळ्या  चवदार आणि पौष्टिक असतात.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्वांना याची आठवण येते. कारण मसाले दुधात चारोळी हवी असते. ईदच्या शिरकुर्म्यातही चारोळी वापरली जाते. श्रीखंड, खीर, बासुंदी, पेढे, बर्फी, आईपीम व इतर मिठाईच्या पदार्थातसुद्धा चारोळी वापरतात. चारोळीची बी वाळवून सोलून ठेवता येते. काजू, बदाम, खारीक, गोडंबी, खडीसाखर आणि चारोळी यांचे मिश्रण करून सुका मेवा तयार केला जातो. चॉकलेट आणि केकमध्ये त्याचा वापर करतात. भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही चारोळीकडे पाहिले जाते. पित्त आणि रक्तदोषांवर चारोळी गुणकारी आहे. चारोळीच्या बियांमध्ये तेल असते.  त्या तेलामुळे केस काळे होतात. झाडाच्या सालीपासून डिंक मिळतो. चारोळीच्या पानांपासून गुरांना चारा उपलब्ध होतो. मज्जा, मेंदू आणि हाडांसाठी चारोळी गुणकारी आहे. हाडांसाठी वंगण पुरवण्याचे काम चारोळी करते.

[email protected]