सीमाभागात मराठी भाषिकांचा काळा दिवस

‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’,  ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणा देत आज कर्नाटक राज्याच्या वर्धापनदिनी कर्नाटकातील लाखो मराठी भाषिकांनी मूक सायकल फेरी काढून काळा दिवस पाळला. नेहमीप्रमाणे लोकशाही मार्गाने मागितलेली परवानगी बेळगाव प्रशासनाने नाकारल्यानंतरही ही मूक फेरी काढण्यात आली. काळे कपडे परिधान करून आणि काळे झेंडे फडकावत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला. या मूक फेरीत मराठी भाषिकांची चौथी पिढी उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती.

सन 1956 मध्ये भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, निपाणी, कारवारसह 865 मराठी भाषिक गावे जबरदस्तीने तत्कालीन म्हैसूर प्रांतात घुसडण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात येण्यासाठी मराठी भाषिक सीमावासीयांनी अनेक आंदोलने केली. कानडी पोलिसांच्या गोळीबारात अनेक मराठी भाषिक हुतात्मे झाले. कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यानंतरही मराठी भाषिकांनी महाराष्ट्रातच राहण्याचा निर्धार कायम ठेवला. त्यामुळे कर्नाटक राज्याच्या वर्धापनदिनी दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी सीमाभागात जबरदस्तीने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ सुतक पाळले जाते. तसेच काळा दिवस पाळला जातो. यंदा 67 व्या वर्षीही सीमाभागात मराठी भाषिकांनी आज काळा दिवस पाळला.

बेळगाव येथील धर्मवीर संभाजी महाराज उद्यान येथून सकाळी मूक सायकल फेरीस सुरुवात झाली. काळी वस्त्र्ाs परिधान करून काळे झेंडे घेऊन हजारो आबालवृद्धांसह ही सायकल फेरी शहराच्या प्रमुख मार्गावरून भारत मंदिर येथे दाखल झाली. येथे सभेचे रूपांतर होऊन सांगता झाली. सीमाभागातील मराठी भाषिकांनी आज व्यवहार बंद ठेवून एकीचे दर्शन घडविले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे कुठे गेले?

सीमाभागात काळादिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांनी प्रतिनिधी पाठवायला पाहिजे होता. खुर्चीसाठी शिंदे कर्नाटक सरकारला घाबरतात का, असा परखड सवाल करत माजी महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा समाचार घेतला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व माजी आमदार मनोहर किणीकर, प्रकाश मरगाळे यांनी यावेळी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.

बेळगावला निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढय़ाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नेहमीच खंबीर साथ दिली आहे. आज कर्नाटक सीमाभागात काळा दिनानिमित्त मराठी भाषिकांच्या बेळगाव येथील मूक सायकल फेरीत सहभागी होण्यासाठी निघालेल्या कोल्हापुरातील शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी बंगळुरू महामार्गावर कागलच्या दूधगंगा नदीवर रोखले. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांत धक्काबुक्की झाली. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी महामार्गावरच ठिय्या मारला. कोणत्याही परिस्थितीत बेळगावला जाणारच, अशा पवित्र्यात असलेल्या शिवसैनिकांना कागल पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, पोपट दांगट, शिवगोंडा पाटील, विद्या गिरी, विशाल देवकुळे, विनोद खोत, विराज पाटील, वैभव आडके, सागर पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते. शिवसैनिकांना रोखण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक पोलिसांनी दूधगंगा नदीवरील पुलावर बंदोबस्त तैनात केला होता.

एक दिवस आम्हाला न्याय मिळेलच – मालोजी अष्टेकर

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर म्हणाले, लोकशाहीमध्ये बोलण्याचे आणि आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य सर्वांना दिले असताना, कर्नाटक पोलीस आणि जिल्हा प्रशासन दबाव आणू शकत नाही. हा दबाव झुगारून मराठी भाषिक जनता अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहे. सीमाप्रश्न सुटावा यासाठी दोन-तीन पिढय़ांनी आंदोलन, सत्याग्रह केले. महाराष्ट्र सरकारने केंद्र आणि कर्नाटक सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात कर्नाटक सरकारच्या वकिलांनी वेळ मागितल्याने पुढची तारीख मिळाली आहे. सीमाप्रश्नी कर्नाटक सरकार वेळकाढूपणा करत आहे. मात्र, मराठी भाषिक जनतेची बाजू न्यायाची असल्याने एक दिवस आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे अष्टेकर यांनी सांगितले.