मंथन – शरीरसौष्ठवला ’स्टेरॉइड’चा विळखा

विक्रांत देसाई

तरुणाईमध्ये पीळदार आणि दमदार शरीरयष्टी बनविण्याची जबरदस्त  क्रेझ आहे. त्याची कारणे तशी वेगवेगळी आहेत. काहींना शरीरसौष्ठव कमवायचे असते, तर अनेकांना टी-शर्ट फिट व्हायचे असते. म्हणजे शर्टलेस असताना समोरच्यावर छाप पडलीच पाहिजे. तरुणी आपल्या तगडय़ा शरीरयष्टीकडे आकर्षित झाल्या पाहिजेत, अशी विविध कारणे त्यामागची असतात. यात काही गैर नाही. परंतु आकर्षक व पीळदार शरीरयष्टी बनविण्यासाठी तरुणाई निवडत असलेला मार्ग मात्र प्रचंड घातक ठरत असल्याचे चित्र आहे. शरीर कमावण्यासाठी पहिली पायरी ही अर्थात व्यायामशाळा असते. तरुण मुले-मुली मोठय़ा संख्येने व्यायामशाळेत जाताना सर्रास दिसतात. तसे पाहता ही खूपच चांगली बाब म्हणावी लागेल. फिट अॅण्ड फाइन राहण्यासाठी वर्कआऊट हा उत्तम पर्याय आहे, पण अलीकडच्या काळात वर्कआऊटला स्टेरॉइडची जोड मिळत असल्याने सर्वच गणित बिघडत चालले आहे.

झटपट शरीरयष्टी बनविण्यासाठी स्टेरॉइडचा सर्रास वापर होताना दिसतो. स्टेरॉइडचे दुष्परिणाम होऊ शकतात याकडे सोयिस्करपणे कानाडोळा केला जातोय. पण हीच चूक वेळप्रसंगी जीव गमावण्यापर्यंत जाऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे. शरीरसौष्ठव हे स्टेरॉइडच्या विळख्यात अडकत असल्याचे खेदाने बोलावे लागत आहे. गेली 20 वर्षे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये मी काम करत आहे. वयाच्या 17 व्या वर्षी मी या शरीरसौष्ठवकडे आकर्षित झालो. तेव्हाच्या शरीरसौष्ठवपटूंची मेहनत ही खरंच वाखाणण्याजोगीच होती. त्यांचे बलदंड बाहू, भरदार छाती, भारदस्त मांडय़ा, पोटऱ्या, पाठीचे मसल, शोल्डर…बस्स बघतच राहावेसे वाटायचे. अर्थात स्टेरॉइडच्या जोरावर हे शरीर कमावलेले नसायचे, तर त्यामागे प्रचंड मेहनत आणि आवश्यक खुराक हे उघड गुपित असायचे. त्याच पावलावर पाऊल ठेवत मीदेखील या क्षेत्रात उतरलो. गेल्या 18 वर्षांत अनेक स्पर्धा खेळलो, आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यत मजल मारली. या वाटचालीत कळत नकळत मी किंवा माझ्या बरोबरच्या काही शरीरसौष्ठवपटूंनीही चुकीची पावले नक्कीच टाकली, पण आम्ही वेळीच सावध झालो. मेहनतीला पर्याय नाही हे अंतिम सत्य आहे हे उमगले तेव्हा चुकीचा मार्ग नकोच हे समजू लागले, पण दुर्दैवाने ही बाब आजही अनेकांच्या लक्षात येत नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.

 गेल्या काही वर्षांपासून फिटनेस इंडस्ट्री आणि शरीरसौष्ठवाला स्टेरॉइड नावाची कीड लागली आहे. ती कीड झपाटय़ाने ऐन तारुण्यात आलेल्या मुलांना आपल्या विळख्यात घेऊन त्यांचे आरोग्य पोखरताना दिसत आहे. आज जे तरुण अथवा शरीरसौष्ठवपटू स्टेरॉइडचे सेवन करत आहेत, त्यातील अनेकांना मधुमेह, रक्तदाब, अस्थमा, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, मानसिक त्रास अशा नको त्या आजारांनी ग्रासले आहे. बाजारात सहजपणे स्टेरॉइड उपलब्ध होत आहे. टर्माईन, एएमपी, मिथाईल असे अत्यंत हानीकारक स्टेरॉइड खूप कमी किमतीत सहज मिळतात. व्यायामशाळांमध्ये येणाऱ्यांना व्यवस्थित व्यायाम करता यावा यासाठी प्रशिक्षक ठेवले जातात, पण सद्यस्थितीत खूप साऱ्या व्यायामशाळांतील प्रशिक्षक आपला खिसा भरण्यासाठी दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार करताना दिसतात. काही प्रशिक्षक हे हानीकारक स्टेरॉइड घेण्याची  शिफारस करतात. स्वस्तात चांगले स्टेरॉइड उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली तरुणांच्या माथी बनावट व शरीरावर

हमखास परिणाम करणारे स्टेरॉइड मारले जात आहे. योग्य मार्गदर्शन व सल्ला मिळत नसल्याने तरुणदेखील असे स्टेरॉइड घेण्यास बळी पडत आहेत. गंभीर म्हणजे केवळ स्टेरॉइडच नव्हे, तर प्रोटिन सप्लिमेंटदेखील बनावट स्वरूपात मिळत आहेत.

विनास्टेरॉइड शरीरसौष्ठव खेळ खेळणे अशक्य आहे, असा या बोगस लोकांचा दावा असतो. अशा महाभागांना एकच प्रश्न आहे की, खरोखर  स्टेरॉइडशिवाय बॉडीबिल्डिंग होऊ शकत नाही का? कारण अगोदरच्या काळात जेव्हा स्टेरॉइडचा वापर होत नव्हता तेव्हाही शरीरसौष्ठव हा खेळ मोठय़ा जोमाने चालत होता.  पूर्वीचे तरुण झपाटून तासन्तास व्यायामशाळेत घाम गाळायचे. पौष्टिक आहार आणि आवश्यक आराम असा त्यांचा दिपाम असायचा. त्या मेहनतीचे फळ म्हणजे उत्कृष्ट शरीरयष्टी बनायचीच, पण त्याहीपेक्षा आरोग्य उत्तम राहायचे. एखादा आजार तेव्हा उत्तम आरोग्य असणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंच्या अवतीभवतीदेखील फिरकायचा नाही. पण आता परिस्थिती उलट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही काळापुरती बाहेरून शरीरयष्टी जबरदस्त नक्कीच दिसते. पण शरीराच्या आत गेलेला स्टेरॉइड, सायलेन्ट किलर म्हणून काम करत असतो. बनावट प्रोटिन सप्लिमेंट आणि स्टेरॉइड शरीरातील विविध अवयवांवर छुप्या पद्धतीने पोखरत असतात. शरीराच्या अंतर्गत भागात जीवघेणा खेळ सुरू असतो. सुरुवातीला त्याची दाहकता समजून येत नसते. कधीकधी स्टेरॉइडचे समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अनेक तरुणांना स्टेरॉइडच्या अतिसेवनामुळे गंभीर आजारपणाला सामोरे जावे लागल्याचे ऐकिवात आहे. अधेमध्ये अमुकतमुक नावाचा शरीरसौष्ठवपटू अंथरूणाला खिळला, एकाने स्टेरॉइडच्या अतिसेवनाने आईवडिलांवर प्राणघातक हल्ला केला, अशा घटना पाहात किंवा वाचत असतो. तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात. शरीरसौष्ठव हा खेळ म्हणजे एक तपश्चर्या आहे. व्यायामशाळेत जाऊन कसून व्यायाम करणे, घाम गाळणे, चांगला आहार घेणे अशा योग्य रीतीने कमावलेले शरीर कधीही हानी पोहोचवत नाही. आजही अनेक व्यायामशाळांमध्ये जुन्या काळातले शरीरसौष्ठवपटू कसून व्यायाम करताना दिसतात. वयाची 70/80 गाठली असतानाही त्यांना कोणत्याही आजाराने ग्रासलेले नाही. कारण त्यांच्या उत्तम आरोग्याचे रहस्य म्हणजे कधीही स्टेरॉइडचे न केलेले सेवन हेच होय. पण हल्लीच्या फास्ट जमान्यातले तरुण फास्ट शरीरयष्टीr बनवण्याच्या नादात स्टेरॉइड नावाचे जीवघेणे विष आपल्या शरीरात टाकत आहेत.

हल्ली ‘तूप खाल्लं की, रूप आलं ’ पाहिजे असा अनेकांचा झटपट यशस्वी होण्याचा फंडा असतो. अशीच गत व्यायामशाळेत जाणाऱ्या तरुणांची असते. बस्स जिममध्ये गेले की, लगेच भारदस्त छाती व ‘डोले शोले’ बनलेच पाहिजेत असा काहींचा अट्टहास असतो. या अट्टहासापोटी मग चुकीचा मार्ग निवडला जातो.  बनावट सप्लिमेंट आणि घातक स्टेरॉइडचा वापर केला जातो. परिणामी त्याचे अत्यंत जीवघेणे दुष्परिणाम होऊन वेळप्रसंगी जीव गमावण्याची वेळ येत असल्याचे वास्तव सध्या दिसते आहे.

सावध होऊ या 

स्टेरॉइड मुक्त शरीरसौष्ठव ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. व्यायामशाळेतील प्रशिक्षक,नामांकित शरीरसौष्ठवपटु, आहार तज्ञ या सर्वांनी आता ‘नो स्टेरॉइड’ असा नारा दिला पाहिजे. आपण आपल्या मुलांना स्टेरॉइड व हानिकारक सप्लिमेंटपासून दूर ठेवले पाहिजे. आपला पाल्य व्यायामशाळेत जात असेल तर तो काय खुराक करतो? तो स्टेरॉइड घेतो का? कुठली सप्लिमेंट घेतो? याची वेळोवेळी पाहणी पालकांनी करणेदेखील गरजेचे बनले आहे.  आरोग्य मंत्रालय, क्रीडा मंत्रालय, शरीरसौष्ठव असोसिएशन, फिटनेस तज्ञ या सर्वांनी या बाबींचा गांभीर्याने विचार करून असलेल्या शरीरसौष्ठव खेळाला आणि उत्तम आरोग्य संपदा बनवू इच्छिणाऱ्या तरुणांना स्टेरॉइडच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हिच काळाची गरज आहे.

शब्दांकन : आशिष बनसोडे << [email protected] >>