लैंगिक छळप्रकरणी बृजभूषण यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने माजी अध्यक्षांच्या याचिका फेटाळल्या

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी इंडिया कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना दिल्ली न्यायालयाने पुन्हा दणका दिला आहे. लैंगिक छळ प्रकरणाची पुढील चौकशी करण्याची, प्रशिक्षकाच्या ‘पह्न कॉल’ची माहिती सादर करण्याची मागणी करणारी बृजभूषण यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली न्यायालयातील न्यायाधीश प्रियंका राजपूत यांनी याप्रकरणी बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी 7 मे ही तारीख निश्चित केली आहे. दरम्यान, बृजभूषण सिंह यांनी आरोपांवरील युक्तिवाद आणि पुढील तपासासाठी वेळ मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुस्ती महासंघाच्या कार्यालयात छळ झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे, मात्र त्या दिवशी मी हिंदुस्थानात नव्हतो, असा दावा बृजभूषण यांनी केला आहे. बृजभूषण यांच्या वकिलाने दावा केला की, दिल्ली पोलिसांनी तक्रारदारासोबत असलेल्या प्रशिक्षकाच्या कॉल डिटेल रेकॉर्डवर विश्वास ठेवला होता आणि ते 7 सप्टेंबर 2022 रोजी कुस्ती महासंघाच्या कार्यालयात गेले असल्याचे सांगितले होते. तिथेच विनयभंग करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी सीडीआर रेकॉर्डवर ठेवलेला नाही, असा दावा वकिलाने केला. दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी बृजभूषण यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते.