प्रचारासाठी उमेदवारांना ‘डमी बॅलेट युनिट’ वापरता येणार; डमी मतपत्रिकाही छापण्यास मुभा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उमेदवारांना ‘डमी बॅलेट युनिट’द्वारे मतदारांना मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यास मुभा आहे. ईव्हीएमवर आपले नाव आणि निवडणूक चिन्ह कुठे आहे हे सांगून आपल्या नावासमोरील बटण दाबण्याचे आवाहन राजकीय पक्षाचे उमेदवार मतदारांना करू शकतात.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डमी बॅलेट युनिटच्या संदर्भात माहिती दिली. राजकीय पक्षाचे उमेदवार किंवा राजकीय पक्ष मतदारांच्या माहितीसाठी डमी बॅलेट युनिटचा वापर करू शकतात. डमी बॅलेट युनिट हे लाकूड, प्लॅस्टिक किंवा प्लाय बोर्ड बॉक्सचे असावे. त्यावरील बटण दाबल्यावर लाईटही लागू शकेल. तसेच उमेदवाराचे नाव व चिन्ह मतपत्रिकेत कोणत्या जागी येईल ही माहिती असलेली डमी मतपत्रिका छापता येईल. मात्र डमी मतपत्रिकेवर अन्य उमेदवारांची नावे किंवा चिन्हे असू नयेत. डमी मतपत्रिका या खऱया मतपत्रिकेचा रंग तसेच आकाराशी मिळती जुळती नसावी अशी अट आहे, अशी माहिती चोक्कलिंगम यांनी दिली.

मतदानासाठी भरपगारी सुट्टी न देणाऱ्या खासगी कार्यालयांवर कारवाई होणार
मुंबईतील खासगी कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱयांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे. सुट्टी किंवा सवलत न देणाऱया खासगी कार्यालयांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

मुंबईत 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मुंबईतील उद्योग समूह, महामंडळे, पंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱयांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी लागणार आहे. सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानासाठी दोन तासांची सवलत द्यावी लागणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.