सीबीएसई बोर्डाच्या तिसरी, सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता तिसरी व सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून तिसरी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-2023 वर आधारित नवीन अभ्यासक्रमाची पाठय़पुस्तके दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी दुसरीपर्यंतच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष 2025-26 पर्यंत सीबीएसई बोर्डाच्या सर्वच वर्गांसाठी नवीन पाठय़पुस्तके तयार केली जाणार आहेत.

नवीन पाठय़पुस्तकांसोबत ब्रिज कोर्सही तयार केले जाणार आहेत. त्यासाठी वेगवेगळय़ा विषयांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या असून अभ्यासक्रम बदल योजनेअंतर्गत ब्रिज कोर्सेस तयार केले जात आहेत. हे ब्रिज कोर्स 25 मार्चपर्यंत एनसीईआरटीच्या वेबसाईवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. जून 2023 मध्ये दुसरीपर्यंतची नवीन पाठय़पुस्तके आली होती आणि यंदा तिसरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांचा अभ्यास करताना कोणतीही अडचण येणार नाही. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, दुसरीत असतानाच या विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यासक्रमाच्या आधारावर जारी केलेल्या पुस्तकांमधून अभ्यास केला आहे.

शिक्षकांना ब्रिज कोर्ससाठी प्रशिक्षण
जुन्या अभ्यासक्रमातून नवीन अभ्यासक्रमाकडे वळताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सहावीमधील सर्व विषयांसाठी अभ्यासक्रम ब्रिज कोर्स डेव्हलपमेंट ग्रुप्स तयार करण्यात आले आहेत. हे ग्रुप्स ब्रिज कोर्स तयार करतील. ब्रिज कोर्ससाठी आधी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर मुलांना नवीन अभ्यासक्रम आणि पॅटर्नबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. ब्रिज कोर्ससाठी हिंदी, संस्कृत, इंग्रजी, उर्दू, विज्ञान, सामाजिक शास्त्र, गणित, कला शिक्षण, आरोग्य-शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण या विषयांसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. नवीन पुस्तके तयार करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे एनसीईआरटीचे म्हणणे आहे.