हिंदुस्थान – म्यानमार सीमांवर लवकरच कुंपण; गृहमंत्री अमित शहांची घोषणा

म्यानमारचे 416 सैनिकांनी कोणत्याही परवानगीशिवाय हिंदुस्थानी हद्दीत घुसल्यानंतर देशात चिंतेचे वातावरण होते. या घटनेनंतर म्यानमारच्या सीमा अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. बांगलादेशप्रमाणेच म्यानमारच्या सीमेवर लवकरच कुंपण घालण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

शनिवारी, अमित शहा हे आसामच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बांगलादेश – हिंदुस्थान सीमेप्रमाणे म्यानमारची सीमा लवकरच संरक्षित करणार असल्याचे सांगितले. या घोषणेसह, हिंदुस्थान – म्यानमार सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना 16 किमी पर्यंत व्हिसा शिवाय (Free Movement Regime) मुक्त संचाराच्या कराराबद्दल ही पुनर्विचार करत असल्याचे सांगितले. हिंदुस्थानातील मुक्त संचार देखील लवकरच बंद करणार असल्याचे शहा यांनी सांगितले.

हिंदुस्थान आणि म्यानमारमध्ये 1,643 किमी लांबीची सीमा आहे. जी मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरूणाचल प्रदेश या राज्यांमधून जाते. या सर्व राज्यांमध्ये मुक्तसंचाराला परवानगी आहे. ही मुभा अॅक्ट ईस्ट धोरणाचा भाग म्हणून 2018 मध्ये लागू करण्यात आली होती.