जीवन प्रवासाची ब्लू प्रिंट

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

जीवन प्रवासात ब्लू प्रिंट बनविल्याशिवाय आपण
या जीवनाची इमारत बांधणार आहोत का

 समजा आपल्याकडे एक प्लॉट आहे. त्या प्लॉटवर आपल्याला घर  बांधायचे आहे. आपण एका आर्किटेक्टला बोलावले तर तो पहिल्यांदा आपल्या गरजा काय आहेत ते विचारेल. किती बेडरूमचे घर हवेय? बैठे हवे की, डुप्लेक्स हवे? रूमचा साधारण आकार काय असेल? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार तो करेल. एकदा का आपल्या गरजांचे पूर्ण आकलन झाले की, मग तो संभाव्य वास्तूची ब्लू प्रिंट तयार करील आणि मगच तो घर उभे करेल.

एका छोटय़ा प्लॉटवर घर बांधण्यासाठी जर आपण ब्लू प्रिंट बनविणार असू तर एवढय़ा मोठय़ा जीवन प्रवासासाठी आपण ब्लू प्रिंट बनवली आहे का?  जर का आपण ही ब्लू प्रिंट बनविली नसेल तर आजच बसून ही ब्लू प्रिंट तयार करा. एका कागदावर निवृत्तीच्या वर्षाची नोंद करा. त्यात आपले स्वप्न किंवा ध्येय कुठल्या वर्षात साध्य करायचे आहे त्याप्रमाणे नोंद करा. त्याच्या बाजूच्या कॉलममध्ये ते साकारण्यासाठी आज किती पैसे लागतील हे लिहा. त्याच्या बाजूच्या कॉलममध्ये महागाईप्रमाणे भविष्यात आपले स्वप्न साकारायला किती पैसे लागतील ते लिहा. त्याच्या बाजूला पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून किती पैसे कुठल्या वर्षी मिळणार आहेत त्याप्रमाणे नोंद करा. शेवटच्या कॉलममध्ये आपण केलेली तरतूद आणि  स्वप्नासाठी लागणारी रक्कम यामधील फरक नमूद करा. एकदा ही ब्लू प्रिंट तयार झाली की,  जीवनाची स्वप्न आणि ध्येय साकारण्यासाठी उत्तम आर्थिक नियोजन करू शकता.

  • आपल्या जीवन प्रवासात अनेक विषय येतात. अगदी मोबाईल घेणे, गाडी घेणेलग्न, परदेश सहल,   घर घेणेमुलांचे शिक्षण. आजारपणासाठी निधी जमा करणे अशा अनेक कारणांसाठी आपल्याला पैसे लागतात.
  • जर आपण आर्थिक सल्लागाराची मदत घेतली तर तो महागाई, आपली मानसिकता, आपली गरज याप्रमाणे आपली ब्लू प्रिंट तयार करील व  ध्येय साकारण्यासाठी जोखीमेचे नियोजन करून  प्लॅन तयार करील.
  • आपल्या आयुष्यात आवश्यक ध्येय आणि आवडीची ध्येय असे दोन प्रकार असतात. आपली ब्लू प्रिंट करताना दोन्ही प्रकारची ध्येय लिहून यादी तयार करा. ज्या ध्येयांना प्राधान्य द्यायचे त्याप्रमाणे  बचतीचे नियोजन करा.
  • बचत व गुंतवणूक करण्यापूर्वी आपली ब्लू प्रिंट तयार करा आणि मगच बचत आणि गुंतवणूक सुरू करा. आपण आखलेल्या ध्येयाच्या कालावधीप्रमाणे, स्वरूपाप्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे गुंतवणूक  करा.  

[email protected]