Chandrayaan 3 Update – तीनपैकी दोन उद्दिष्टे पूर्ण, पुढील 13-14 दिवस महत्त्वाचे; ‘इस्त्रो’ दिली माहिती

हिंदुस्थानच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळात झेपावलेले ‘चांद्रयान-3’ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. बुधवारी 23 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आणि हिंदुस्थानने इतिहास रचला. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा हिंदुस्थान पहिला देश ठरला आहे.

विक्रम लँडरच्या लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हर त्यापासून वेगळे झाले आणि कामाला लागले. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारत असून माहितीही गोळात करत आहे. ‘इस्त्रो’च्या वैज्ञानिकांचे याकडे बारीक लक्ष आहे. या मोहिमेबाबत आता इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

‘चांद्रयान-3’ मिशनची बहुतेक उद्दिष्टे पूर्णत्वाकडे आहेत. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर व्यवस्थित कार्यरत आहेत. सर्व वैज्ञानिकांना डेटा खूप चांगला दिसत आहे. आम्ही बराच डेटा गोळा करू. पुढील 14 दिवस चंद्रावरून येणाऱ्या डेटाचा अभ्यास करू. आम्हाला चांगले यश मिळण्याची आशा असून पुढील 13-14 दिवस आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे एस. सोमानाथ म्हणाले.

दरम्यान, ‘चांद्रयान-3’चे यशस्वी लँडिंग आणि विदेशातून येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथील इस्त्रोच्या कंमांड सेंटरला भेट दिल्याबद्दल एस. सोमनाथ यांनी आनंद व्यक्त केला. चांद्रयान -3 यशस्वीरित्या लँड झाल्याने आणि मोदींच्या दौऱ्यामुळे आम्ही आनंदी असल्याचे ते म्हणाले.

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘इस्रो’च्या कमांड सेंटरला भेट देऊन ‘चांद्रयान-3’ च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. मोदी यांनी शास्त्रज्ञांसमोर 45 मिनिटे भाषण केले. ज्यावेळी ‘चांद्रयान-3’ चे लँडिंग झाले. त्या दिवशी मी दक्षिण आफ्रिकेत होतो. नंतर ग्रीसला गेलो, परंतु माझे मन पूर्णपणे तुमच्याकडे लागले होते. माझे मन म्हणत होते की, तुम्हाला नमन करावे, परंतु मी हिंदुस्थानात पोहोचताच तुमच्या दर्शनासाठी आलो. मला तुम्हाला सॅल्यूट करायचे होते. सॅल्यूट तुमच्या परिश्रमाला… सॅल्यूट तुमच्या धैर्याला… सॅल्यूट तुमच्या भावनांना… असे मोदींनी म्हटले.

23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस; चांद्रयान उतरले तो भाग ‘शिवशक्ती पॉइंट’

या वेळी पंतप्रधान मोदी यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. दरवर्षी 23 ऑगस्टला हिंदुस्थानात ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ साजरा केला जाणार आहे. चंद्रावर ज्या ठिकाणी लँडर उतरले त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती पॉइंट’ तर चंद्रावर ज्या ठिकाणी ‘चांद्रयान-2’ चा स्पर्श झाला आहे त्या ठिकाणी ‘तिरंगा पॉइंट’ संबोधले जाणार आहे.