ना पेपर्सचा, ना फाईल्सचा ढीग! सरन्यायाधीशांची केबिन पूर्णपणे ‘डिजिटल’

डिजिटल सुनावणीला प्राधान्य देणारे देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्वतःची केबिन डिजिटल कामकाजाचे आदर्श उदाहरण बनवली आहे. खरंतर सरन्यायाधीशांची केबिन कशी असेल, याची सर्वांना उत्सुकता होती. याचे उत्तर एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने मिळवले आहे. सरकारी कार्यालय म्हटले की, फाईल्सचे भलेमोठे ढीग डोळय़ापुढे उभे राहतात, मात्र सरन्यायाधीशांची केबिन याला अपवाद आहे. ना पेपर्सचा, ना फाईल्सचा ढीग… सरन्यायाधीशांच्या केबिनमध्ये कुठेही कागदपत्रांची गुंतागुंत नाही. केवळ एक फाईल असते, तीही दिवसभराच्या शेडय़ुलची. जे निर्देश द्यायचे तेही लॅपटॉप वा डेस्कटॉपवरून. ते स्वतः ई-मेलना उत्तर देतात. त्यांचा हा डिजिटल मूलमंत्र देशभर काwतुकाचा विषय बनला आहे.

आमच्या सर्व फाईल्स ‘ई फाईल्स’ आहेत. लॅपटॉप, संगणकाचा उपयोग करणे खूप सोपे झाले आहे. म्हणूनच तुम्हाला माझी केबिन कोर्टरूमप्रमाणेच डिजिटल पाहायला मिळेल.

धनंजय चंद्रचूड, सरन्यायाधीश

खूप बिझी शेडय़ुल;  ‘पंच आऊटची वेळ नाही!

सरन्यायाधीशांचे शेडय़ुल खूप व्यस्त असते. सर्वसाधारणतः न्यायालयीन कामकाज 4.30 ते 10 या वेळेत चालते. सरन्यायाधीशांची गोष्ट वेगळी आहे. काम सुरू करण्याची वेळ ते कधी चुकवत नाहीत. मात्र पंच आऊटची वेळ निश्चित नसते. रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय कामे व बैठका सुरूच असतात.