मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला ड्रग्ज माफियांचा अड्डा! फरार तस्कर एल्विश यादवचे एकनाथ शिंदेंकडून आदरातिथ्य

विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पाटर्य़ांचे आयोजन केल्या प्रकरणी फरार असलेला ड्रग्ज माफिया एल्विश यादव याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात एल्विश हा मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी उपस्थित होता. शिंदे यांनी शाल, श्रीफळ देऊन त्याचे आदरातिथ्यही केले होते, अशी खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर एल्विश यादवच्या उपस्थितीचे फोटो ‘एक्स’ या सोशल नेटवर्पिंग साईटवर पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे. एल्विश हा गणपतीची आरती करतोय आणि मुख्यमंत्री शिंदे त्याच्या बाजूला उभे आहेत असे फोटोमध्ये दिसत आहे. शिंदे यांनीच एल्विशला गणेश दर्शनासाठी बोलवले होते, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादवसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले आहे.

सापाच्या विषापासून ड्रग्ज बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारखा गंभीर गुन्हा एल्विश यादवविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्जचे सेवन आणि विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरातिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादवसारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहेत का? असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

‘आधीच राज्यात ड्रग्ज कारखाने सापडत आहेत, ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो, मग पळवून लावला जातो आणि इथे ‘वर्षा’ वर नशाबाज आरती करतो. हे आहे महायुती सरकार,’ अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादवसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे. मुख्यमंत्री शाल, श्रीफळ देऊन नशेबाजाचे आदरातिथ्य करत आहेत. आधीच राज्यात ड्रग्ज कारखाने सापडत आहेत, ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो, मग पळवून लावला जातो आणि इथे ‘वर्षा’वर नशाबाज आरती करतो. हे आहे महायुती सरकार, अशी तोफ विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डागली.

या जातीचे साप पकडले

तस्करांकडून एकूण 9 साप पकडण्यात आले. यात 5 कोब्रा, एक अजगर, दोन डोके असलेला साप, उंदीर साप यांचा समावेश आहे.

स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकला

मनेका गांधी यांच्याशी संबंधित पीएफए या संस्थेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून एल्विशचे रॅकेट समोर आले आहे. नोएडा पोलिसांनी एल्विशवर एफआयआर दाखल केला आहे.

असा लावला ट्रप…

यूटय़ूबर एल्विश यादव काही लोकांसोबत नोएडा-एनसीआरमधील फार्म हाऊसमध्ये सापाचे विष आणि जिवंत सापांचे व्हिडीओ शूट करत असल्याचे पीएफएने सर्वप्रथम उघड केले.
एका एनजीओमार्फत एल्विशशी संपर्क साधण्यात आला. त्याने एल्विशला नोएडामध्ये रेव्ह पार्टी आयोजित करण्यास आणि कोब्राच्या विषाची व्यवस्था करण्यास सांगितले. एल्विशने राहुल नावाच्या एजंटचा नंबर दिला. राहुलला पह्न केला व एल्विशचा संदर्भ दिला असता त्याने रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यास होकार दिला.
2 नोव्हेंबरला राहुलने सेक्टर-51 सेव्हरॉन बँक्वेट हॉलमध्ये येण्याचे मान्य केले. गौरवने याबाबतची माहिती नोएडाच्या वन विभागाला दिली. त्यानंतर डीओफओची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि कोतवाली सेक्टर-49 तसेच वन विभागाच्या संयुक्त कारवाईत तस्करांना बेडय़ा ठोकण्यात आल्या.

पाच साथीदारांना अटक

‘बिग बॉस’ विजेता यूटय़ूबर एल्विश यादवचे ड्रग्ज रॅकेट नोएडा पोलिसांनी उघडकीस आणले आहे. विषारी सापांची तस्करी, ड्रग्ज पुरवठा आणि रेव्ह पाटर्य़ांचे आयोजन केल्या प्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 5 तस्करांना अटक करण्यात आली असून एल्विश फरार झाला आहे.

यूटय़ूबर्सची गँग

अटकेतील पाच जणांकडून 9 साप व सापाचे 20 मिली विष जप्त करण्यात आले. ही यूटय़ूबर्सची गँग असून ती रेव्ह पाटर्य़ा आयोजित करते व त्यात नशेसाठी सापाच्या विषाचा वापर केला जातो, असे अधिकाऱयांनी सांगितले. एल्विशने आतापर्यंत अनेक रेव्ह पाटर्य़ांचे आयोजन केले असून या पाटर्य़ांसाठी परदेशी डान्सर आणल्या जायच्या, असे उघड झाले.