सिक्कीममध्ये ढगफुटी; 23 जवानांसह 88 बेपत्ता, 10 जणांचा मृत्यू

सिक्कीममध्ये मंगळवारी रात्री उशिरा अक्षरशः ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेले. पुरामुळे दहा जणांचा मृत्यू झाला, तर 88 जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. यात सैन्यदलाच्या 23 जवानांचाही समावेश आहे. बेपत्ता सर्व जवानांचा मृत्यू झाल्याची शक्यता न्यायदंडाधिकारी ताशी चोपेल यांनी व्यक्त केली आहे. बेपत्ता जवानांचे शोधकार्य अविरतपणे सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्याकडून पूरस्थितीचा आढावा घेतला आणि मदतीचे आश्वासनही दिले.

नदीकिनारी आर्मी कॅम्प होता. ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाल्यामुळे हा कॅम्प पुराच्या भक्ष्यस्थानी पडला. पुरात 41 गाडय़ा वाहून गेल्या. आसपासच्या भागातील चार हजार नागरिकांना पाच मदत शिबिरात सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पुरामुळे सिक्कीमला देशाशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग एनएच-10 देखील वाहून गेला. रस्ताच वाहून गेल्यामुळे सिक्कीमकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला असून परिस्थिती अतिशय गंभीर बनल्याचे चित्र आहे. रात्री जवळपास दीड वाजण्याच्या सुमारास ल्होनक नदी परिसरात ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीची पातळी धोक्याबाहेर जाऊन आसपासचा परिसर पाण्याखाली गेल्याचे सैन्यदलाच्या जनसंपर्क अधिकाऱयांनी सांगितले.

नदीची पाणीपातळी 20 फुटांनी वाढली

ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी तब्बल 15 ते 20 फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे आसपासचा परिसर पाण्याखाली गेला. अनेक घरे बुडाली. त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा लागला. पश्चिम बंगालच्या कलिम्पोंगमध्येही पुरसदृश स्थिती असून आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यांची ओळख पटली नसल्याचे मुख्य सचिव एच. के. द्विवेदी यांनी सांगितले.

पुढच्या 48 तासांसाठी पूर्वेकडील आणि ईशान्येकडील राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.