चेतनचे सहकारी सशस्त्र होते, मात्र घाबरून शौचालयात जाऊन लपले

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये सोमवारी चेतन कुमार सिंह नावाच्या रेल्वे पोलीस दलाच्या हवालदाराने 4 जणांची गोळ्या घालून हत्या केली होती. मृतांमध्ये चेतनचे वरिष्ठ टीकाराम मीणा यांचाही समावेश होता. चेतन जेव्हा गोळ्या झाडत होता तेव्हा रेल्वे पोलीस दलातील त्याचे दोन सहकारीही जवळच होते, मात्र त्यांना चेतनने धमकावल्याने ते शौचालयात जाऊन लपले होते. चार जणांची हत्या रोखण्यास असमर्थ ठरल्याने या दोघांविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे.

धावत्या ट्रेनमध्ये चेतनचा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम मीणा यांच्यात वाद झाला होता. चेतनने मीणा यांच्यावर गोळी झाडली होती आणि मीणा यांनी प्रत्युत्तरात त्यांच्या पिस्तुलातूनही गोळी झाडली होती. हे सगळं घडत असताना हवालदार अभय आचार्य आणि वरिष्ठ हवालदार नरेंद्र परमार हे शौचालयात लपून बसले होते. हे दोघेजण चेतन आणि मीणा यांच्यासोबत जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर होते. ही दुर्घटना टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याने आणि घाबरून शौचालयात जाऊन लपल्याने या दोघांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

रेल्वे सुरक्षा दलाच्या या चार जवानांची ड्युटी सौराष्ट्र मेलमध्ये लावण्यात आली होती. मुंबई सेंट्रलवरून ही ट्रेन 30 जुलैच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास निघाली होती. सुरतला ही ट्रेन 31जुलैच्या पहाटे 1.10 ला पोहोचली होती.या चौघांची ड्युटी नंतर मुंबईकडे येणाऱ्या जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये लावण्यात आली होती. ही ट्रेन पहाटे 2.53 ला मुंबईकडे निघाली होती. मीणा यांची ड्युटी एसी कंपार्टमेंटमध्ये लावण्यात आली होती तर इतर हवालदारांची ड्युटी स्लीपर कोचमध्ये लावण्यात आली होती. हे सगळेजण बी-2 बोगीत चढले होते आणि सगळ्यांनी आपापल्या डब्यात जाण्यापूर्वी चर्चा करूया असं ठरवलं होतं.

सुरतहून ट्रेन निघाल्यानंतर चेतनने मीणा यांना आपल्याला बरं वाटत नसल्याने मी घरी जातो असं सांगितलं होतं. हवालदार अभय आचार्य यांनी तू बरा दिसतोय, तुला काही झालं नाहीये असं म्हटलं. चेतनने टीसीकडे विचारणा केली असता टीसीने सांगितलं की वरिष्ठांची परवानगी असेल तर तू वलसाडला उतरू शकतोस. यावर मीणा यांनी त्याला सांगितलं की आपण लवकरच मुंबईला पोहोचू, तू आराम कर. मीणा यांनी ही बाब वरिष्ठांनाही कळवली होती. त्यांनी मीणा यांना आदेश दिले होते की चेतनला ड्युटीवरून सोडू नये.

हवालदार आचार्य यांनी चेतनला बरं वाटावं म्हणून कोल्डड्रींक दिलं होतं, मात्र त्याने ते पिण्यास नकार दिला आणि वाद घालायला सुरूवात केली. चेतनने आचार्य यांचा अचानक गळा दाबण्यास सुरुवात केली आणि तुझं पिस्तुल मला दे असं धमकावले. घाबरलेल्या आचार्य यांनी त्यांचे पिस्तुल चेतनला दिले. याबाबत आचार्य यांनी वरिष्ठांना कळवले होते. वरिष्ठांनी तत्काळ ही बाब मीणा यांना सांगण्यास सांगितलं होतं. मीणा यांनी मध्यस्थी केली असता चेतनने आचार्य यांचे पिस्तुल त्यांना परत दिले.

पहाटे 5 च्या सुमारास आचार्य यांनी पाहिले की चेतनने त्याच्या पिस्तुलाचे कव्हर काढले आहे. तो गोळीबार करेल या भीतीने आचार्य यांनी ही बाब मीणा यांना कळवली. हे कळवल्यानंतर ते कोचमधून निघून गेले होते. सकाळी 5.25 च्या सुमारास वैतरणा रेल्वे स्टेशन गेल्यानंतर गोळीबाराला सुरुवात झाली होती. मीरारोड येईपर्यंत हा गोळीबार सुरू होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

चेतन याने बी-२ बोगीतील प्रवाशाचे अपहरण करून त्याला ओलीसही ठेवले होते. या प्रवाशाला पँट्रीमध्ये नेऊन चेतनने त्याची हत्या केली होती. हा गोळीबार सुरू असताना आचार्य आणि परमार हे दोघे शौचालयात जाऊन लपले होते. चेतनने आपल्याला प्रवासी समजावे, ओळखू नये यासाठी एका टीसीने आपले कपडे बदलले होते. आचार्य आणि परमार हे दोघे सशस्त्र असतानाही त्यांनी हा गोळीबार थांबवण्यासाठी प्रयत्न केले नाही आणि चेतनला आवरले नाही असा त्यांच्यावर आरोप आहे. मिडडे या वर्तमानपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.