काँग्रेसने न्यायपत्रावर मागवली जनतेची मते

 

न्याय संकल्पनेवर आधारित काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे अनेकांनी क्रांतीकारी म्हणून स्वागत केले असून, लोकांनी या जाहीरनाम्याविषयी त्यांचे अभिप्राय, मतप्रदर्शन सोशल मीडियाद्वारे शेअर करावेत, असे आवाहन केले आहे.

गांधी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात त्यांनी हे आवाहन केले आहे. ‘मी हा व्हिडिओ काल रात्री साडेबारा वाजता बनवला, पण खूप रात्र झालीय पोस्ट करायला असे माझ्या टीमला वाटले म्हणून आता सकाळी पोस्ट करत आहे,’ असे त्यांनी या व्हीडीओबरोबरच्या मजकुरात म्हटले आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा हा प्रत्येक भारतीयाचा आवाज आहे, तुमचे अभिप्राय सोशल मीडियावर शेअर करा, असे त्यांनी म्हटले आहे.

 

लोकांचे आभार

लोकांनी आपल्याकडे केलेल्या अनेक सूचना, अभिप्राय यामुळे हा जाहीरनामा तयार करायला मदत झाली. मी सर्वांचा आभारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया द्या, त्यातील कोणते मुद्दे आवडले आणि कोणते नाही तेही सांगा, असे आवाहन त्यानी केले आहे. पाच न्याय स्तंभ आणि त्या अंतर्गत 25 हमी याची त्यात नोंद आहे. शिक्षणाचा अधिकार, पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी, एससी, एसटी ओबीसी यांच्या आरक्षणावरील मर्यादा वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती, देशव्यापी जातनिहाय जनगणना आणि अल्पकालीन लष्करी भरतीसाठी अग्निपथ योजना रद्द करणे अशी काही आश्वासने काँग्रेसने जाहीरनाम्यात दिली आहेत.