धार्मिक विद्वेष वाढवणाऱ्या मोदींवर कारवाई कराच, निवडणूक आयोगाकडे काँग्रेसची तक्रार

भाजपकडून होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाबद्दल निवडणूक आयोग हातावर हात ठेवून गप्प असल्यामुळे भाजप नेत्यांनी आक्षेपार्ह आणि आचारसंहिता भंग करणाऱया वक्तव्यांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आता त्याच प्रकारची टोकाची वक्तव्ये करत आहेत. काँग्रेसकडून ‘संपत्तीचे फेरवाटप’ केले जाईल हे मोदींनी राजस्थानमधील प्रचार सभेत केलेले वक्तव्य विभाजनवादी, द्वेषपूर्ण आणि एका विशिष्ट धार्मिक समाजाला लक्ष्य करणारे असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करत सोमवारी काँग्रेसने मोदींवर कारवाई करण्याची मागणी केली.

काय म्हणाले होते मोदी…

काँग्रेस घुसखोरांना संपत्ती देणार, त्यांच्या जाहीरनाम्यात अधिक मुले असणाऱयांना संपत्तीचे फेरवाटप करणार असे म्हटले आहे. तुमचे मंगळसूत्रही काँग्रेस सोडणार नाही, अशी धार्मिक द्वेषाला खतपाणी घालणारी वक्तव्ये मोदी यांनी रविवारी बांसवाडा येथील सभेत केली होती.

दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा उद्देश

पंतप्रधानांच्या संपूर्ण भाषणावरच आमचा आक्षेप असला तरी, या निवेदनात आम्हाला त्यांच्या भाषणातील संपूर्णपणे अभूतपूर्व आणि द्वेषजनक आरोपांकडे लक्ष वेधायचे आहे. दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उघड उद्देशाने त्यांनी केलेली विधाने आम्ही अधोरेखित करू इच्छितो. भारताच्या आजवरच्या इतिहासातील एका विद्यमान पंतप्रधानांची ही अशी वक्तव्ये प्रत्युत्तराविना आणि कोणत्याही कारवाईविना खपवून घेतली जाऊ शकत नाहीत, अशा रोखठोक शब्दांत काँग्रेसने आयोगाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.

आयोगावरही काँग्रेसने ठेवला ठपका

मोदी आणि भाजप नेत्यांकडून वारंवार आचारसंहिता धाब्यावर बसवली जात आहे. हे निदर्शनास आणून देऊनही आयोग आतापर्यंत काहीच कारवाई न करता निष्क्रिय राहिल्यामुळेच पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून अशी धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्ये वारंवार केली जात आहेत. त्यांची हिंमत वाढली आहे, असा जोरदार हल्ला काँग्रेसने आपल्या तक्रार पत्रातून चढवला आहे.