भाजपच्या ‘त्या’ जाहिरातीविरोधात काँग्रेस आक्रमक; ECI कडे तक्रार, कारवाईची मागणी

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झाले असून 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या दोन टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसणार असल्याचे विश्लेषण राजकीय तज्ज्ञांनी केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिंक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच भाजपने दिलेल्या एका जाहिरातीविरोधात राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाने आज वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिराती विरोधात तक्रार केली.

याबाबत बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाल्याची जाणिव झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. आज एका आघाडीच्या दैनिकात पहिल्या पानावर ‘कुठे जल्लोष व्हायला पाहिजे हे भारतात की पाकिस्तानात हे पाहून मतदान करा’, अशी जाहिरात दिली आहे. भाजपसोबत त्यांचे सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी ही जाहिरात दिली आहे.

पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्यानी खाणारा पंतप्रधान पाहिजे की मणिपूरमध्ये जाऊन पीडितांचे सांत्वन करणारा पंतप्रधान पाहिजे अशी आम्ही जाहिरात देऊ शकतो. पण आमच्याकडे कार्यक्रम आहे, भाजपकडे शाही कार्यक्रम नाही. आम्ही भाजपा विरोधात आज राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिका-याकडे तक्रार केली, अशी माहिती अतुल लोंढे यांनी दिली.

अजित पवारांना 4 जूननंतर मिशा काढून फिरावे लागेल; श्रीनिवास पवार यांचा पलटवार

आम्ही यापूर्वी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी राम सातपुते, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात तक्रार केली होती. निवडणूक आयोगाला कारवाई करायला एवढा वेळ का लागतो याबाबत आम्ही विचारणा केली. निवडणूक आयोगाकडे आम्ही पुरावे दिले आहेत. भाजप, अजितदादा गट आणि शिंदे गटाच्या उमेदवारांच्या उमेदवारी रद्द करावी अशी मागणी आम्ही आज राज्याच्या निवडणूक अधिका-याकडे केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे भाजपची तळी उचलायला आलेले, विनायक राऊत यांचा घणाघात