अजित पवारांसोबतच्या गुप्त बैठकीबाबत संभ्रम, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे करणार शरद पवारांशी चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त बैठकीनंतर संभ्रम निर्माण झाला होता. शरद पवार यांनी त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे स्वतः शरद पवारांशी याबाबत चर्चा करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली.

काँग्रेस कोअर कमिटीची बैठक आज मुंबईतील एमसीए क्लबमध्ये पार पडली. 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजीच्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठकीनंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार-अजित पवार गुप्त बैठकीबाबत अजूनही संभ्रम कायम असून काँग्रेसची काय भूमिका आहे, असे या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी पटोले यांना विचारले. त्यावर शरद पवार यांनी इंडिया आघाडीसोबतच राहणार असे स्पष्ट केले असून काँग्रेस हायकमांडही 31 ऑगस्टला शरद पवार यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

भाजप हेच आमचे टार्गेट

काँग्रेस व मित्र पक्षांनी एकत्र लोकसभा निवडणुका लढल्या तर 40-45 जागा जिंकू शकू असे चित्र राज्यात आहे. त्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू असून आमचे टार्गेट भारतीय जनता पक्ष आहे. जे पक्ष सोबत येतील त्यांच्यासह लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे, असे नाना पटोले या वेळी म्हणाले.