हिंदुस्थान–चीनमध्ये सीमा शांत ठेवण्यावर एकमत

हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील प्रलंबित सीमावाद, संपूर्ण सैन्य माघार यांसारख्या प्रश्नांवर सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्यरत यंत्रणेची 29वी बैठक बुधवारी बीजिंग येथे पार पडली. मात्र या चर्चेत फार काही प्रगती झाली नाही, मात्र दोन्ही देशांमध्ये सीमा शांत ठेवण्यावर एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सैन्य माघार आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील प्रलंबित मुद्दय़ांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने उभय देशांनी परस्परांचे म्हणणे आणि तपशीलाचे आदानप्रदान केले, असे परराष्ट्र खात्याकडून आज सांगण्यात आले. राजनैतिक आणि लष्करी पातळीवर नियमित संपर्क राखण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली आहे. परराष्ट्र खात्याचे संयुक्त सचिव (पूर्व आशिया) गौरंगलाल दास यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व हाँग लियांग यांनी केले.