रोनाल्डोने संपविला जेतेपदाचा दुष्काळ! अल नासर क्लबला ऐतिहासिक विजेतेपद

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर सौदी अरेबियाच्या अल-नासर या क्लबशी करारबद्ध झाला. सौदी अरेबियात रोनाल्डोचे पदार्पण फारसे समाधानकारक नव्हते. मात्र हळूहळू त्याने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करायला सुरुवात केली. किताबी लढतीत दोन खेळाडू मैदानाबाहेर असतानाही 9 खेळाडूंसह खेळणाऱया रोनाल्डोने आपल्या अल नासर संघाला अरब क्लब चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून देण्याचा पराक्रम केला. रोनाल्डोने तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विजेतेपदाचा दुष्काळ संपविला. याआधी त्याने 2021 मध्ये इटालियन क्लब जुव्हेंट्ससाठी कोपा इटालिया स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

विश्वचषक स्पर्धेनंतर मँचेस्टर युनायटेडने रोनाल्डोपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. अल नासर क्लबने किताबी लढतीत अल हिलाल संघाचा 2-1 गोलफरकाने पराभव करीत अरब क्लब चॅम्पियनशिप चषक स्पर्धेतील झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. या जेतेपदाच्या लढतीतील दोन्ही गोल हे ख्रिस्तियानो रोनाल्डोनेच केले, हे विशेष. 51 व्या मिनिटाला मायकलच्या गोलने अल हिलालला आघाडी मिळवून दिली. 71व्या मिनिटाला अब्दुल्लाह अल आमरीला रेड कार्ड दाखविल्यानंतर अल नासरची परिस्थिती आणखीनच बिकट झाली, मात्र तीन मिनिटांनी रोनाल्डोने गोल केला. संघाचा आणखी एक खेळाडू नवाद बुशाल यालाही 78 व्या मिनिटाला लाल कार्ड मिळाले. आता अल नासरचे मैदानावर फक्त 9 खेळाडू होते. निर्धारित 90 मिनिटांनंतर उभय संघ 1-1 असा बरोबरीत होता. अतिरिक्त वेळेत 98 व्या मिनिटाला रोनाल्डोची जादू पुन्हा एकदा कामी आली. 9 खेळाडूंसह खेळताना त्याने एक गोल करून आपल्या संघाला 2-1 ने आघाडीवर नेले. 115 व्या मिनिटाला दुखापतीमुळे रोनाल्डोला मैदान सोडावे लागले. अल हिलालने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण गोल करू शकला नाही. अशा प्रकारे रोनाल्डोने अल नासर संघाला पहिला करंडक जिकून देत ऐतिहासिक कामगिरी केली.

रोनाल्डोचा सलग पाचव्या सामन्यात गोल

ख्रिस्तियानो रोनाल्डोने अल नासर क्लबकडून खेळताना मागील पाचही लढतींत गोल केले. अल नासरने उपांत्य लढतीत 1-0ने बाजी मारली होती. तो एकमेव गोलही रोनाल्डोनेच केला होता. उपांत्यपूर्व लढतीतही त्यानेच एकमेव गोल केला होता. अरब क्लब चॅम्पियनशिपध्ये सर्वाधिक गोल केल्यामुळे रोनाल्डो हाचगोल्डन बुटाचा मानकरी ठरला. 38 वर्षीय रोनाल्डोने अल नासर क्लबसाठी आतापर्यंत 25 लढतींत 20 गोल केलेत.